WhatsApp

“३३ लाखांची अ‍ॅम्ब्युलन्स ८६ लाखांना?” रोहित पवारांचा सरकारवर थेट घणाघात

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई |
महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेत तब्बल ६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ही माहिती उघड केली असून संबंधित कंपनीच्या मालकाला झारखंडमध्ये झालेल्या दारू घोटाळ्यात अटक झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.



या घोटाळ्यातील “सुमित फॅसिलिटीज” नावाची कंपनी ३३ लाखांची रुग्णवाहिका ८६ लाखांला विकत असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. यामुळे आरोग्य खात्याच्या योजनांमध्ये ६ हजार कोटींपेक्षा अधिकचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

“झारखंडमध्ये ही कंपनी मनुष्यबळ पुरवण्याचे काम करत होती, आणि तेथेच त्यांना अटक झाली. महाराष्ट्रात मात्र याच कंपनीला मोठ्या प्रमाणावर आरोग्याशी संबंधित कामं मिळाली. आम्ही वारंवार आवाज उठवूनही शासनाने दुर्लक्ष केलं,” असे पवार यांनी स्पष्ट केले.

यासोबतच त्यांनी असा इशारा दिला की, “या प्रकरणात कोणाला किती खोके दिले गेले, कुणाच्या माध्यमातून व्यवहार झाले याचे पुरावे लवकरच महाराष्ट्रासमोर ठेवणार आहे.” त्याचबरोबर त्यांनी सरकारला अ‍ॅम्ब्युलन्स निविदा प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्याचा सल्लाही दिला.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार सरकारवर आक्रमक भूमिका घेत आहेत. नुकतेच त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा कथितपणे मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे त्यांच्या आरोपांना राजकीय वर्तुळात मोठे वजन प्राप्त झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!