WhatsApp

राज्यातील पहिला ‘काचेचा पूल’ सिंधुदुर्गात! नापणे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, पण सुविधा कोठे?

Share

अकोला न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग : राज्यातील पहिला काचेचा पूल आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध नापणे धबधब्यावर पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरू लागला आहे. सिंधू रत्न योजनेतून ९९.६३ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या काचांच्या पुलामुळे निसर्गाच्या सौंदर्याचा थरारक अनुभव घेता येतो. मात्र, पुलासोबतच मूलभूत सुविधा नसल्यानं महिला पर्यटकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.



नापणे धबधबा बारमाही वाहणारा असून हिरव्यागार झाडीच्या कुशीत वसलेला हा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरलेला आहे. धबधब्यावरून कोसळणाऱ्या फेसाळलेल्या पाण्याचं दृश्य, हवेत उडणारे तुषार आणि शेजारच्या कातळांवर रेखाटलेली प्राणीचित्रं हे सर्व मिळून या परिसराचं सौंदर्य खुलवतात. त्यात भर म्हणून आता उभारण्यात आलेल्या काचेच्या पूलामुळे पर्यटकांना धबधब्याचं दृश्य अगदी जवळून पाहण्याची संधी मिळत आहे.

या पुलावर कमानी पद्धतीचे रंगीत रेलिंग्स, लाकडी भासवणाऱ्या आकर्षक पायऱ्या आणि सुरुवातीला उभारलेले कृत्रिम फुलपाखरू यामुळे हा पूल ‘सेल्फी पॉईंट’ ठरत आहे. पावसाळ्यात विशेषतः याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वैभववाडी तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पश्चिम महाराष्ट्रातून होणारा प्रवेशद्वार असल्याने नापणे धबधबा हे प्रथमच येणाऱ्यांचे मुख्य स्थळ ठरत आहे.

पर्यटनदृष्ट्या नापणे धबधब्याचा विकास सुरू असला, तरी इथे महिलांसाठी आवश्यक अशा शौचालय, चेंजिंग रूम यांसारख्या सुविधा नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. धबधब्यावर आनंद लुटणाऱ्या महिलांसाठी कपडे बदलण्याची व्यवस्था नसल्यामुळे तिथे काही वेळ थांबण्याचे धाडसही कोणी करत नाही. यासंदर्भात स्थानिकांनी आणि पर्यटकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, लवकरच या सुविधांचा विचार केला जावा अशी मागणी होत आहे.

Watch Ad

या धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करताना सौंदर्य टिकवून ठेवत सोयीसुविधांचा समावेश करणे आता अत्यावश्यक बनले आहे. अन्यथा, इतक्या मोठ्या गुंतवणुकीनंतरही पर्यटकांचा अनुभव अर्धवटच राहील.

Leave a Comment

error: Content is protected !!