अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत संसदेबाहेर व सभागृहात आंदोलन केले. बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादी पडताळणी प्रक्रियेविरोधात ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी काळे कपडे परिधान करून संसदेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवर गंभीर आरोप करत महाराष्ट्रात मॅच फिक्सिंग झाल्याचा पुनरुच्चार केला.
राहुल गांधी म्हणाले की, देशात निवडणूक प्रक्रियेची चोरी सुरू असून ती उघड करण्याचे काम आम्ही करत आहोत. महाराष्ट्रात मॅच फिक्सिंग कसे झाले याचे उदाहरण सर्वांसमोर आणले. कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघातही मतांची चोरी झाल्याचे आढळले असून लवकरच याचा तपशीलही समोर आणला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
संसदेबाहेर आंदोलनात काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे संजय राऊत, द्रमुकचे टी.आर. बालू, कनिमोळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिसा भारती यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले. या नेत्यांनी ‘लोकशाही वाचवा’, ‘मतांची चोरी बंद करा’, ‘राज्यघटना वाचवा’ अशा घोषणा देत ‘एसआयआर’ (Special Intensive Revision) मोहिमेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मोठा गोंधळ झाल्याने अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, रस्त्यावरचे वर्तन संसदेत नको. जर फलक घेऊन सभागृहात आल्यास कारवाई करावी लागेल. संसदेच्या गरिमा राखल्या गेल्या पाहिजेत, असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी आरोप केला की, बिहारमध्ये अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक समुदायांचा मतदानातून अप्रामाणिकपणे वगळला जात आहे आणि ही प्रक्रिया केंद्र सरकारच्या सहमतीने सुरू आहे. याविरोधात ‘इंडिया’ आघाडीची लढाई केवळ संसदेत नाही तर रस्त्यावरही सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.