WhatsApp

आयुष म्हात्रेचा विश्वविक्रम! इंग्लंडविरुद्ध युवा कसोटीत ऐतिहासिक शतक

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई |
भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने इंग्लंड दौऱ्यात ऐतिहासिक कामगिरी करत नवा जागतिक विक्रम आपल्या नावे केला. इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात त्याने केवळ ६४ चेंडूंमध्ये शतक झळकावले आणि युवा कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला.



इंग्लंडने भारतासमोर ३५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सलामीवीर वैभव सूर्यवंशी पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आयुषच्या खांद्यावर आली. मात्र, दडपण झुगारून आयुषने ८० चेंडूत १२६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली. अवघ्या २५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अभिग्यान कुंडूसह त्याने ७७ चेंडूत ११७ धावांची भागीदारी करत सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकवलं.

विशेष म्हणजे, आयुषने २०२२ मध्ये इंग्लंडच्या जॉर्ज बेलने श्रीलंकेविरुद्ध केलेल्या ८८ चेंडूतील शतकाचा विक्रम मोडला. या मालिकेत पहिल्या कसोटीतही त्याने १०७ चेंडूंत शतक ठोकले होते. याशिवाय, १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १२६ धावा करणारा तो एकमेव भारतीय युवा कसोटी फलंदाज ठरला आहे.

या दौऱ्यावर त्याने १०२, ३२, ८० आणि १२६ अशा चार डावांमध्ये एकूण ३४० धावा केल्या आहेत. त्याच्या खेळीत तब्बल ९ षटकार होते, ज्यामुळे त्याने सौरभ तिवारीचा १९ वर्षांखालील कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही मागे टाकला आहे.

Watch Ad

आयुष म्हात्रेने १९ वर्षांखालील कसोटीत भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा (२०६) करण्याचा इतिहासही रचला आहे. त्याच्या पुढील वाटचालीकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!