WhatsApp

नागपूरात भरदुपारी थरार; सावत्र मुलीच्या नवऱ्याने सासूचा रस्त्यातच केला खून

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर |
सिव्हिल लाईन्ससारख्या नागपूरच्या उच्चभ्रू भागात भरदिवसा सावत्र सासूचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. माया पसेरकर (वय ५८) या महिलेचा सावत्र जावई मुस्तफा खान मोहम्मद खान याने रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार करत खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मृत माया या जवाहर वसतिगृहाजवळ राहणाऱ्या आणि सिव्हिल लाईन्समधील बंगल्यात घरकाम करणाऱ्या महिला होत्या. बुधवार दुपारी दोन वाजता त्या काम आटोपून घरी जात असताना आरोपी मुस्तफाने त्यांना आमदार निवासाजवळ अडवले. काही महिन्यांपासून दोघांमध्ये पाच लाख रुपयांच्या उधारीवरून वाद सुरू होता. संतप्त झालेल्या मुस्तफाने मायेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. जीव वाचविण्यासाठी माया पळू लागल्या पण काही क्षणांतच रस्त्यावर कोसळल्या आणि जागीच मृत्युमुखी पडल्या.

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी लगेचच तपास सुरु करत आरोपी मुस्तफाला अटक केली. तो माया यांची सावत्र मुलगी गीताचा चौथा नवरा असल्याचे समोर आले आहे.

या घटनेने नागपूरच्या शांत वातावरणाला तडा गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा, सार्वजनिक ठिकाणी खून झाल्याने पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!