WhatsApp

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचं नाव जोडायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Share

अकोला न्यूज नेटवर्क
कुटुंबात नवीन सदस्य आल्यावर त्याचं नाव रेशन कार्डात नोंदवणं आवश्यक असतं. शासनाच्या अन्नवाटप योजनांचा लाभ मिळवण्यासाठी योग्य आणि अद्ययावत शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. नव्याने विवाह झालेली सून असो, नवजात बाळ असो किंवा अन्य कुणी सदस्य – त्यांच्या नावाची नोंदणी कशी करावी याबाबत अनेकांना माहिती नसते. ही प्रक्रिया ऑनलाइन, मोबाईल अ‍ॅप व ऑफलाईन पद्धतीने सहज पार पाडता येते.



आवश्यक कागदपत्रे:
सदस्याच्या ओळखीचा पुरावा (आधारकार्ड), रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाइल नंबर. सुनेचं नाव जोडायचं असल्यास तिचं विवाह प्रमाणपत्र व आधारकार्ड आवश्यक. बाळाचं नाव जोडायचं असल्यास जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ऑनलाईन पद्धत:
राज्याच्या अन्नपुरवठा विभागाच्या वेबसाइटवर लॉगिन करून ‘Add New Member’ पर्याय निवडावा. फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करावी. फॉर्म सबमिट झाल्यावर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. या क्रमांकावरून अर्जाची स्थिती पाहता येते. सर्व पडताळणीनंतर आठवडाभरात नवा रेशनकार्ड घरी पोस्टाने येतो.

मोबाईल अ‍ॅपमार्फत प्रक्रिया:
‘मेरा रेशन अ‍ॅप 2.0’ डाऊनलोड करावा. आधार संलग्न मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. लॉगिन केल्यावर ‘Family Details’ व ‘Add New Member’ या पर्यायांवर जाऊन फॉर्म भरावा. आवश्यक कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करून फॉर्म सबमिट करता येतो. अर्जाची स्थिती अ‍ॅपवरच ट्रॅक करता येते.

ऑफलाईन पद्धत:
जवळच्या अन्नपुरवठा कार्यालयात जाऊन संबंधित फॉर्म भरावा. आवश्यक कागदपत्रे जोडून ५० ते १०० रुपये शुल्क भरून अर्ज द्यावा. अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करून नावाची नोंद करतात. पावतीवरून अर्जाच्या स्थितीची माहिती मिळते.

सर्व पद्धती सुलभ असून नागरिकांनी वेळेत नोंदणी करून अन्नवाटप योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!