अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | विधिमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर ‘रमी’ हा खेळ खेळताना आढळले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आता या व्हिडिओचं नेमकं चित्रीकरण कोणी केलं, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई विधिमंडळ सचिवालयाच्या माध्यमातून केली जात असून यामुळे विधान परिषदेत नवा वादंग निर्माण झाला आहे.
या प्रकरणावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारवर टीकास्त्र सोडत X (माजी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर एक रोखठोक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पतीच्या खुन्यांना न्याय मिळावा म्हणून दोन वर्षांपासून एक विधवा आक्रोश करतेय, न्यायालयाचे आदेशही धाब्यावर मारले जातात. मात्र विधिमंडळात रमी खेळणाऱ्या मंत्र्याचा व्हिडीओ कोणी काढला, याची सरकार गतीने चौकशी करतंय.” असा टोला रोहित पवारांनी लगावला.
रमी खेळणाऱ्या मंत्र्याला जाब विचारण्याऐवजी, हा प्रकार उघड करणाऱ्याची शहानिशा करण्यात येत असल्यामुळे सरकारची भूमिका संशयास्पद ठरत आहे. “ही चौकशी म्हणजे सामान्य माणसाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोपही विरोधकांनी केला आहे.
म्हणूनच आता संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात चंद्रफेक झाली असून, सभागृहातील शिस्त, मंत्रीपदाची जबाबदारी आणि सरकारची प्राथमिकता यावर नवा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.