अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी थकित बिले मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचे 1.40 कोटी रुपयांचे देयक राज्य सरकारकडून प्रलंबित होते. यासाठी हर्षल यांनी सुमारे 65 लाखांचे कर्ज घेतले होते. परंतु बिले वेळेत न मिळाल्याने आर्थिक विवंचना वाढत गेली आणि अखेर त्यांनी स्वतःच्या शेतात गळफास लावून जीवन संपवले.
या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आमदार जयंत पाटील यांनी यासंदर्भात सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले की, “हर्षल पाटील याने शासनाच्या त्रासाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली आहे. सरकारच्या खोट्या रोजगाराच्या वचनांमुळे अशा अनेक तरुणांचे स्वप्न उद्ध्वस्त होत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “केवळ एका कंत्राटदारावर नव्हे तर अनेक मजुरांच्या कुटुंबावर या परिस्थितीचा परिणाम होतो. ही परिस्थिती केवळ जलजीवन मिशनपुरती मर्यादित नसून अनेक खात्यांची अशीच अवस्था आहे. जर हेच चित्र राहिले तर शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारही आत्महत्या करतील, ही भीती वाटते.”
हर्षल पाटील यांनी आत्महत्येपूर्वी अनेक मित्रांना ‘शासन पैसे देत नाही, लोक तगादा लावत आहेत, आत्महत्या करतो’ असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. पोलिस तपास सुरू असून, कंत्राटदार संघटनांनी सरकारकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
