अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली | भारतात आगामी तिमाहीत फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमतीत 10 ते 15 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिपसेट आणि मेमरी मॉड्यूलच्या दरात झालेली लक्षणीय वाढ, तसेच स्मार्टफोनमध्ये एआय आणि जनरेटिव्ह एआय (जेनएआय) क्षमतेचा समावेश हे यामागील प्रमुख कारण आहे. इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते, ही दरवाढ केवळ प्रीमियम नव्हे तर मिड-रेंज फोनलाही भेडसावणार आहे.
काउंटरपॉइंट रिसर्चचे उपाध्यक्ष नील शाह यांनी सांगितले की, स्मार्टफोनमध्ये AI फिचर्ससाठी लागणाऱ्या अॅडव्हान्स चिपसेट्समुळे उत्पादन खर्च वाढतोय. त्यामुळे ब्रँड्सकडे किंमती स्थिर ठेवण्याची मुभा राहिलेली नाही. परिणामी, फ्लॅगशिप फोनच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढतील. ही वाढ थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करणारी ठरणार आहे.
तैवानस्थित मीडियाटेकचे वरिष्ठ संचालक थॉमस सीएच यांनी स्पष्ट केले की, स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी आवश्यक घटक महाग झाले आहेत. मात्र ग्राहक प्रीमियम फोनसाठी अधिक पैसे द्यायला तयार असल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही निर्माते आणि पुरवठादारांकडून खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या रिसर्च मॅनेजर उपासना जोशी यांनी सूचित केले की, चिपसेटच्या किमतीत चलनवाढीचा परिणाम जाणवतो आहे. ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडल्यास भारतातील स्मार्टफोन विक्रीत घट येऊ शकते. विशेषतः जे फोन 30,000 रुपयांहून अधिक किमतीचे आहेत, त्यांना ही AI क्षमतेसह दरवाढीचा थेट फटका बसणार आहे.
एकूणच, उत्पादन खर्च वाढल्याने प्रीमियम स्मार्टफोन महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी ग्राहकांचा खरेदीवर परिणाम होईल, तसेच स्मार्टफोन विक्रीमध्ये घसरण होण्याची भीती व्यक्त होत आहे.