अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | राज्यातील महिलांना मिळणाऱ्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवर मोठा खर्च होऊ लागल्याने सरकारने लाभार्थी महिलांची छाननी सुरू केली होती. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही छाननी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यामुळे काही महिन्यांसाठी महिलांना मिळणारा १५०० रुपयांचा हफ्ता सुरूच राहणार असला तरी निवडणुकांनंतर परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.
या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. त्यामुळे अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याची योजना होती. यासाठी केंद्र सरकारकडून प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबांचा तपशील मागवण्यात आला होता.
लाडकी बहीण योजनेत सध्या २ कोटी ३४ लाख महिलांना लाभ मिळतो. मात्र, अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी करून योजनेचा खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तथापि, मुंबई महापालिका, जिल्हा परिषद व नगरपंचायतीसारख्या स्थानिक निवडणुकांमध्ये मतांची गणितं बिघडू नयेत म्हणून सध्या छाननी थांबवण्यात आली आहे.
निवडणुका होईपर्यंत नोदणी केलेल्या सर्व महिलांना योजनेचा हफ्ता सुरूच राहणार आहे. पण निवडणुकांनंतर सरकार नव्याने छाननीस सुरुवात करेल व उत्पन्नाच्या आधारावर महिलांना अपात्र ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘हफ्ता थांबतोय का’ या भीतीने अनेक महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.