WhatsApp

राहुल गांधींचा गंभीर आरोप : “महाराष्ट्रात मतांचा घोळ करून निवडणूक चोरली, सरकारकडे ठोस पुरावे आहेत”

Share

नवी दिल्ली | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत भाजपवर मतांचा घोळ करून निवडणूक जिंकल्याचा पुनरुच्चार केला आहे. “महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार अचानक प्रकट झाले, त्यांचा वापर करून ही निवडणूक चोरली गेली,” असे राहुल गांधी म्हणाले.



गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की त्यांच्या हाती ‘ब्लॅक अँड व्हाईट’ स्वरूपात पुरावे आहेत आणि हे पुरावे लवकरच निवडणूक आयोगासमोर मांडले जाणार आहेत. “कर्नाटकात आम्ही ही मतचोरी पकडली, आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हेच घडत आहे,” असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, निवडणुकीदरम्यान विशिष्ट मतदारसंघाची संपूर्ण यादी कागदावरून डिजिटल फॉरमॅटमध्ये घेतली, त्याचे विश्लेषण करण्यात सहा महिने गेले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनियमितता समोर आली. “कोण मतदान करतं, कुठून होतं, कोणते मतदार बनवले गेले याचा सारा शोध आम्ही घेतला आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारवर आणि निवडणूक यंत्रणेवर शंका उपस्थित करत म्हटले, “भारतामध्ये निवडणूक चोरली जाते, हेच आजचं वास्तव आहे.” त्याचबरोबर बिहारमध्येही मतदान यंत्रणा नव्याने तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

राहुल गांधी यांनी याआधी ७ जून २०२५ रोजी “Match-fixing Maharashtra” या शीर्षकाखाली एक लेख लिहून निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले होते. त्यात त्यांनी मतदानाच्या वेळेनंतरही मतदान सुरू राहिल्याचा, फेक मतदारांची निर्मिती, आकड्यांतील अनैसर्गिक वाढ, सीसीटीव्ही फुटेज लपवणे, आणि मशिन-योग्य मतदार याद्या रोखण्याचे आरोप मांडले होते.

या लेखाला महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रत्युत्तर देणारा लेख लिहून राहुल गांधींच्या आरोपांना “राजकीय अपयशाची कहाणी” असे म्हटले होते.

सध्याच्या वातावरणात या नव्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोग आता या आरोपांची काय दखल घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!