अकोला न्यूज नेटवर्क
सोलापूर : शहरातील भूषण नगर परिसरात एका धर्मगुरूकडून तीन महिलांना पैसे आणि लग्न जमवण्याच्या आमिषाने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी गळ घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित ५० वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार, संबंधित धर्मगुरूने धार्मिक भावना दुखावल्या असून महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.
संबंधित धर्मगुरू भूषण नगर भागात सुमारे नऊ वर्षांपासून कुटुंबासह राहत असून, त्याने आपल्या घरासमोर तात्पुरते प्रार्थनास्थळ उभारले आहे. या ठिकाणी प्रार्थना सभा घेतल्या जात असून परिसरातील काही महिला या सभांमध्ये सहभागी होत असत. दरम्यान, या धर्मगुरूने पीडित महिलेसह अन्य दोन महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे आमिष दाखवत धर्म बदलण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, या धर्मगुरूने एका महिलेला “तुमच्या मुलाचे लग्न जमत नसेल, तर आमच्या धर्मात या, लगेच लग्न जुळेल” असे सांगून भावनिक गळ टाकली. दुसऱ्या एका महिलेला लाल रंगाचे पाणी पाजल्याचा प्रकारही समोर आला आहे. तर तिसऱ्या महिलेला “प्रार्थना सभांमध्ये नियमित या, गाणी म्हणा, आणि आमच्या धर्मात सामील व्हा” असे सांगत दडपण आणले गेले.
सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी सांगितले की, या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. धर्मगुरूने महिलांच्या श्रद्धा, आर्थिक गरजा आणि कौटुंबिक अडचणींचा वापर करत त्यांना धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त केल्याचा प्राथमिक संशय आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांनी अशा प्रकारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणावरही दबाव टाकून धर्म बदलायला लावणे हे कायद्याने गुन्हा आहे, हे पोलीस प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केले आहे.