अकोला न्यूज नेटवर्क
अनुराग अभंग – जिल्हा रिपोर्टर
अकोला | अकोल्याच्या कीर्ती नगरमधील आलिशान घरातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा खदान पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीवरून केलेल्या कारवाईत ५ युवक आणि ५ युवती आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेतले. नेमकं काय घडलं, कोण होते सहभागी, आणि किती काळापासून चालत होता हा गैरव्यवसाय? वाचा सविस्तर…
आलिशान घरात सुरू होता देहव्यापार – पोलिसांची कारवाई उशिरा का?
अकोला शहरातील गोरक्षण रोडवर असलेल्या कीर्ती नगर भागात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. खदान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एका आलिशान घरावर छापा टाकून सेक्स रॅकेट उध्वस्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिला आणि एक पुरुष या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार होते.
या छाप्यात एकूण ५ युवक आणि ५ युवती आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महिलांकडून व्हॉट्सॲपवरून युवतींचे फोटो पाठवले जात होते. पसंतीनुसार, त्याच घरातच व्यवहार उरकले जात होते. प्रत्येकी २ ते ५ हजार रुपयांची रक्कम आकारली जात होती, असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.
पोलिसांनी २.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त, पुढील तपास सुरूच
घटनास्थळी पोलिसांनी मोबाईल फोन्स, रोख रक्कम आणि दुचाकी असा मिळून २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कुंटणखाना चालवणाऱ्या दोन महिला व एका पुरुषाविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA Act) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री सुरू झाली.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पीएसआय दीपक पवित्रकार, मयुरी सावंत, दादाहरी वनवे यांच्यासह एकूण १५ सदस्यीय पथकाने ही कारवाई अत्यंत योजनाबद्ध रित्या पार पाडली.
कोण कोण आहेत अटकेतले? आरोपींची नावेही आली समोर
अटक करण्यात आलेल्या युवकांमध्ये जयेश नरेश अग्रवाल (३२), अब्दुल मुजाहीद (३०), विशाल चांडक (३२), निजाम चौधरी (२५), अजय जामनीक (२९) या अकोला परिसरातील व्यक्तींचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही मंडळी या रॅकेटशी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या संबंधित होती.
सध्या पोलिसांचा तपास या रॅकेटच्या मुळांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने सुरू असून, हा देहव्यापार किती काळ चालू होता, आणखी कोण यात सामील आहेत, आणि ग्राहकांची यादी कशी तयार केली जात होती, या बाबींचा सखोल शोध घेतला जात आहे.
यांनी केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, व पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, खदान पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वात, पोउपनि दिपक पवित्रकार, पोउपनि दादाहरी वनवे, मपोउनि मयुरी सावंत, निलेश खंडारे, अमित दुबे, विजय मुलनकर, सह फौ दिनकर धुरंदर, रवी काटकर, अभिमन्यु सदांशिव, वैभव कस्तुरे, अर्चना बोदडे, सोनल गवई, धनश्री वाहुरवाघ, अंजुशा रत्नपारखी यांनी केली.
या प्रकारच्या घटनांमुळे समाजातील नैतिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. उघडपणे सुरू असलेल्या देहव्यापारामुळे युवकांची मानसिकता, महिलांची सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलकी या सर्व बाबी धोक्यात येतात. पोलिसांनी अशा रॅकेट्सवर त्वरित कारवाई करून समाजात विश्वास निर्माण करण्याची गरज अधोरेखित होते.
अशा प्रकारच्या अनैतिक धंद्यांविरोधात जागरूक राहा. तुमच्या परिसरात कुठेही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या. अशा आणखी खळबळजनक बातम्यांसाठी वाचा www.annakolanews.in आणि फॉलो करा ANN Akola News Network वर.