अकोला न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एका 23 वर्षीय तरुणीला सोशल मीडियावरून जाळ्यात ओढून आक्षेपार्ह व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने तिच्याकडून 1.11 लाख रुपये उकळल्याचा आरोप असून, या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
8 जुलै रोजी पीडित महिला इंस्टाग्रामवर रील्स पाहत असताना ‘यूके मॅरेज ब्युरो’ नावाच्या एका प्रोफाइलवर लक्ष गेले. या प्रोफाइलवर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर ‘राहुल यूके’ नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सअॅपवर संवाद सुरू झाला. काही दिवसांच्या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांनी वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण सुरू केली.
संपर्क अधिक दृढ झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने महिलेला व्हिडिओ कॉलवर बोलावले आणि तिला कपडे काढण्यास सांगितले. महिलेला वाटले की समोरचा व्यक्तीही तेच करतो आहे, त्यामुळे तिने अनाहकपणे कपडे काढले. मात्र, कॉल एक मिनिटातच बंद झाला. काही वेळातच त्या व्यक्तीने सांगितले की व्हिडिओ रेकॉर्ड केला असून तो इंटरनेटवर व्हायरल करणार, असे धमकावले.
11 जुलैला आरोपीने पुन्हा संपर्क साधला आणि सांगितले की तो मुंबई विमानतळावर अडकलाय व त्याला सुटका करण्यासाठी पैसे लागतील. महिलेला गोंजारत त्याने 1.11 लाख रुपये तिच्याकडून घेतले. काही दिवसांनी महिलेला फसवणुकीची जाणीव झाली आणि तिने पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात आयटी कायद्यानुसार तसेच फसवणूक, धमकी आणि अश्लील वर्तनासंबंधी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सायबर क्राइम युनिटकडून या घटनेचा तपास सुरू असून, वापरलेला मोबाईल नंबर आणि संबंधित लिंकचा मागोवा घेतला जात आहे.
या प्रकारामुळे महिलांच्या सोशल मीडिया वापरातील सावधगिरीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर अनोळखी लिंक आणि व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.