अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेचा एकमेव आधार आहे. पण अनेक कर्मचाऱ्यांना हे माहित नसते की, PF खात्यातून सर्व पैसे काढल्यास त्याचा थेट फटका त्यांच्या पेन्शन हक्कांवर बसतो. EPFOच्या नियमांनुसार जर EPS (Employee Pension Scheme) फंडातील रक्कम काढली गेली, तर कर्मचाऱ्याला पेन्शन मिळण्याचा अधिकारही संपतो.
EPS आणि EPF मध्ये काय फरक आहे?
प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या १२ टक्के रक्कम त्याच्या PF खात्यात जमा होते. नियोक्ताही १२% रक्कम जमा करतो. यापैकी ८.३३% रक्कम थेट EPS मध्ये जाते – याच रकमेतून निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. उर्वरित ३.६७% रक्कम EPF खात्यात जमा होते. कर्मचाऱ्याला याचा थेट वापर करता येतो, मात्र EPS फंड निवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्यासाठी राखून ठेवला जातो.
EPS फंड काढल्यास पेन्शन मिळणार नाही!
अनेक वेळा नोकरी बदलताना किंवा तातडीच्या गरजेमुळे काहीजण PFमधून संपूर्ण रक्कम काढतात. पण EPSमधील रक्कम काढली गेल्यास, कर्मचाऱ्याची पेन्शनसाठीची पात्रता संपते. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याने १० वर्षांहून अधिक काळ नोकरी केली आणि EPSमध्ये नियमित योगदान दिले, तरी नोकरी सोडल्यानंतर EPSमधील रक्कम काढल्यास त्याला निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही.
पेन्शन सुरक्षित ठेवायचं असेल तर काय करावं?
EPFOच्या नियमानुसार, कर्मचाऱ्याने कमीत कमी १० वर्षे EPSमध्ये योगदान दिले आणि त्या रकमेचा वापर न करता ती तशीच ठेवली, तर तो व्यक्ती वयाच्या ५० वर्षांनंतर पेन्शनसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे, PFमधून पैसे काढतानाही EPS फंडाला स्पर्श न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
महत्त्वाचा इशारा:
कर्मचाऱ्यांनी EPS फंड काढण्याऐवजी त्याला तसाच ठेवून केवळ EPFचा भाग काढावा. EPS सुरक्षित ठेवल्यास पेन्शनचा मार्ग खुला राहतो. अनेकांना EPS आणि EPFमधील फरक ठाऊक नसल्याने ते सगळा PF काढतात आणि नंतर निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन मिळत नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.