WhatsApp

छावा संघटनेचा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल; जालना ते संभाजीनगर दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर संतप्त कार्यकर्त्यांचा धडका

Share

अकोला न्यूज नेटवर्क
जालना |
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना मारहाण केल्याच्या घटनेनंतर मराठवाडा पेटला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत छावा संघटनेचे कार्यकर्ते जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर येथे रस्त्यावर उतरले. विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यालयांवर दगडफेक, फोटो फाडणे, पोस्टर जाळणे, घोषणाबाजीसह जाळपोळीचा प्रयत्न करण्यात आला.



जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या कार्यालयावर रात्री १२ च्या सुमारास छावा कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यावेळी कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्नही झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात सूरज चव्हाण यांच्या फोटोला आसूड मारून निषेध व्यक्त केला. लातूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी घोषणाबाजी करत संतप्त प्रतिक्रिया दिली.

धाराशिव येथेही राष्ट्रवादीच्या जिल्हा संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी पत्ते उधळत तीव्र संताप व्यक्त केला. याठिकाणी अजित पवार आणि सूरज चव्हाण यांचे पोस्टर फाडण्यात आले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, लातूर येथील घटनेनंतर सूरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात विवेकानंद पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ११ जणांविरोधात कारवाई सुरू असून पोलिसांच्या दोन स्वतंत्र पथकांनी शोधमोहीम सुरू केली आहे. विवेकानंद पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यांनी सूरज चव्हाण यांचा शोध घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.

छावा संघटनेने सरकारला थेट इशारा देत सांगितले आहे की, सूरज चव्हाण यांना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. राज्यात मराठा समाजाचे असंतोषाचे पडसाद उमटत असून, यामुळे राजकीय तापमान पुन्हा एकदा चांगलेच वाढले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!