अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. “सध्याच्या सरकारातील चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असून, या संपूर्ण कटाचा सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ असल्याचे पुरावे आहेत,” असा दावा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
राऊतांनी एका प्रफुल्ल लोढा नामक व्यक्तीचे नाव घेतले असून, त्यालाच हनी ट्रॅपमागील मुख्य सूत्रधार ठरवत फडणवीसांसोबतचे त्याचे फोटो सादर केले. “हा पेन ड्राईव्ह शोधा. त्यात भाजपचे दोन मंत्रीही सापडतील,” असे आव्हानही त्यांनी दिले. राऊतांनी या हनी ट्रॅपचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत असल्याचे नमूद करत प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले.
या पत्रकार परिषदेत राऊतांनी महाविकास आघाडीतील काही खासदारांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप केला. “ईडी, सीबीआयसोबतच चार खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले. त्यांना सीडी दाखवून पक्षफोडी केली गेली,” असे स्पष्ट करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचा रोख ठेवला.
राऊतांनी फडणवीसांवर थेट टीका करताना म्हटले, “हे सरकार आधी घटनाबाह्य होतं, आता ते अनैतिकही झालं आहे. फडणवीस हे कायद्याचे पदवीधर असले तरी त्यांच्यात सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही.” त्यांनी काल खासदार सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांद्वारे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा संदर्भ देत भाजपच्या महिला नेत्या गप्प का आहेत, असा सवालही उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही त्यांनी टीका करत “शिंदेंचं आता भाजपला ओझं वाटतं आहे. त्यांचं राजकीय भविष्यच अंधारात आहे,” असं सांगितलं.
या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नव्याने तणाव निर्माण झाला असून, विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.