अकोला न्यूज नेटवर्क
जम्मू | जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी रविवारी काँग्रेसने मोठे आंदोलन छेडले. मात्र, आंदोलन सुरु होण्याआधीच पोलिसांनी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली. जम्मूतील काँग्रेस मुख्यालयाजवळ मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘हमारी रियासत, हमारा हक’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पण पोलिसांनी राजभवनकडे काढण्यात येणारा मोर्चा रोखला.
या आंदोलनाचं नेतृत्व प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष तारिक हमीद कारा आणि पक्षाचे सरचिटणीस जी. ए. मिर यांनी केलं. नियोजनानुसार, या मोर्चाच्या माध्यमातून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना निवेदन देऊन राज्याचा दर्जा पुनःस्थापन करण्याची मागणी करण्यात येणार होती. मात्र, प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारली आणि सर्वांना अडवण्यात आलं.
श्रीनगरमध्येही शनिवारी काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी रोखला होता. ही दुसरी वेळ आहे की काँग्रेसच्या राज्यदर्जाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारली. यावर प्रतिक्रिया देताना कारा म्हणाले, “आम्ही शांततामय मार्गाने जनतेचा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण प्रशासनाने आमच्यावर अटकाव केला. ही लोकशाहीविरोधी कृती आहे.”
“ही अटक आम्हाला दडपवू शकत नाही. आमचा लढा अधिक तीव्र होईल. राज्याच्या लोकांना अधिकार आणि प्रतिनिधित्व पुन्हा मिळालेच पाहिजे,” असे जी. ए. मिर यांनी म्हटले. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा, ही मागणी केंद्र सरकारसमोर तीव्रतेने मांडली जात आहे.