अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेत अंतर्भूत असलेल्या कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना (EDLI) मध्ये केंद्र सरकारने नुकतेच महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या PF खात्यात पैसे असोत वा नसो, कुटुंबाला किमान ५० हजार रुपयांचा विमा लाभ मिळणार आहे. संगठित क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे.
कामगार मंत्रालयाने EDLI योजनेचे नियम सुलभ करत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक सुरक्षेचे कवच आणले आहे. नव्या नियमांनुसार, जर कर्मचारी नोकरी करताना मरण पावला आणि त्याने १२ महिने सलग काम केले असेल, तर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, नोकरीत ६० दिवसांचा खंड आला तरी ती सेवा सातत्यपूर्ण मानली जाणार आहे. यामुळे नोकरी बदलताना झालेल्या तात्पुरत्या ब्रेकचा विम्यावर परिणाम होणार नाही.
नवीन तरतुदींनुसार, कर्मचाऱ्याचा मृत्यू शेवटच्या पगारात PF कपात झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत झाल्यासही कुटुंबाला विमा मिळणार आहे. पूर्वी खात्यात किमान ५० हजारांची शिल्लक असणे बंधनकारक होते, पण आता ती अट शिथिल करण्यात आली आहे.
EDLI ही योजना EPFOच्या अंतर्गत राबवली जाते. या योजनेअंतर्गत नियोक्ता दरमहा निश्चित रक्कम जमा करतो, तर कर्मचारीकडून कोणतेही वेगळे योगदान घेतले जात नाही. कुटुंबीयांना हा लाभ एकरकमी स्वरूपात मिळतो, जो किमान ५० हजार आणि कमाल ७ लाख रुपयांपर्यंत असतो.
या बदलांमुळे विशेषतः अल्पवेतन गटातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वेळा त्यांच्या खात्यात शिल्लक रक्कम नगण्य असते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना विम्याचा लाभ मिळत नव्हता. आता मात्र अशा कुटुंबीयांनाही आधार मिळणार आहे. नोकरी बदल, तात्पुरता ब्रेक आणि अकस्मात मृत्यू या सर्व गोष्टींचा विचार करून हे निर्णय घेण्यात आले आहेत.
सरकारच्या या पावलामुळे संगठित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित झाले आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबांची सामाजिक सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.