अकोला न्यूज नेटवर्क
मोतिहारी (बिहार) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये नेहमीच प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मात्र बिहारमधील मोतिहारी येथे नुकत्याच झालेल्या सभेतील एक अनोखी घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात महिलांमध्ये खुर्च्यांवरून हाणामारी होताना दिसत आहे. सभास्थळीच महिलांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आणि गोंधळ उडाला. या घटनेने सुरक्षा यंत्रणांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
सदर घटना शुक्रवारी मोतिहारी येथे मोदींच्या निवडणूक प्रचारसभेदरम्यान घडली. माहितीप्रमाणे, कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आले होते. मात्र बसण्याची पुरेशी व्यवस्था न केल्याने महिलांमध्ये खुर्ची मिळवण्यासाठी शाब्दिक वाद झाला. हा वाद हळूहळू धक्काबुक्की आणि नंतर थेट खुर्चीफेकीपर्यंत गेला. या झटापटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, महिलांच्या दोन गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. काही महिला साड्या अडकलेले अवस्थेत असतानाही हातात खुर्च्या घेऊन हल्ला करताना दिसतात. तर काहीजण डोकं वाचवण्यासाठी खुर्चीचा ढाल म्हणून वापर करत असल्याचे पाहायला मिळते. हे दृश्य पाहून सभास्थळी पोलीस आणि स्वयंसेवकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही काळासाठी वातावरण पूर्णतः गोंधळात गेले होते.
हा व्हिडिओ नेमका कधी आणि कोणत्या कोनातून चित्रीत झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र हा व्हिडिओ मोदींच्या मोतिहारी येथील सभेचाच असल्याचा दावा करण्यात येत आहे. ‘सकाळ’ या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
@gharkekalesh नावाच्या एका एक्स (पूर्वीचे ट्विटर) युजरने हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या प्रकारावर टीका केली असून, काहींनी विनोदी टिप्पण्या दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “खुर्चीची लढाई आता जनतेपर्यंत आली आहे.” दुसऱ्याने लिहिलं, “खुर्ची तर सगळ्यांनाच हवी आहे.” तर तिसऱ्या एका युजरने म्हटलं, “एकीकडे मोतिहारी मुंबईसारखं होणार, तर लोक आधीच युद्धाच्या तयारीत आहेत.”
या घटनेने निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये होणाऱ्या अव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, नियंत्रणासाठी अधिक सुरक्षा, आणि गर्दीचं व्यवस्थापन याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. सध्या तरी या गोंधळामुळे मोदींच्या भाषणापेक्षा अधिक लक्ष या खुर्ची युद्धाने वेधलं आहे.