अकोला न्यूज नेटवर्क
भंडारा | अवघ्या पंधरा दिवसांच्या बाळाची ७० हजार रुपयांत विक्री करून बनावट दस्तावेजांच्या आधारे अवैध पद्धतीने दत्तक घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महिला व बालविकास विभागाने या प्रकरणात गंभीर दखल घेत सात जणांविरोधात साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी राज्यपाल हरिचंद रंगारी व सुचिता रंगारी (रा. हसारा, ता. तुमसर), अजित टेंभुर्णे व त्यांची पत्नी सोनाली, नंदकिशोर मेश्राम, राकेश टेंभुर्णे, आणि पुष्पलता रामटेके (सर्व रा. घानोड, ता. साकोली) यांची नावे तपासात समोर आली आहेत.
चाइल्ड हेल्पलाइनवर मिळालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक चौकशी करण्यात आली. यामध्ये स्पष्ट झाले की, एप्रिल २०२४ मध्ये साकोली तालुक्यातील एका उपकेंद्रात जन्मलेले बाळ केवळ १५ दिवसांचे असताना, १०० रुपयांच्या मुद्रांकपत्रावर बनावट दत्तक लेख लिहून विकले गेले.
या बाळाला दत्तक घेतल्याचा बनाव करणाऱ्या पालकांनी भंडारा शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्याचे बनावट कागदपत्र तयार केले. या आधारे नगर परिषद भंडारामार्फत नव्याने जन्म प्रमाणपत्र देखील मिळवण्यात आले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी ना कोणताही न्यायालयीन आदेश होता, ना कायदेशीर पद्धतीने मंजुरी. सर्व प्रकार आपसी बनवटीवर व विश्वासावर घडवण्यात आला.
या प्रकारात आर्थिक देवाणघेवाण झाली असून, बाळासाठी ७० हजार रुपये दिल्याची माहितीही समोर आली आहे. यासह संबंधितांनी बालहक्क कायद्यातील तरतुदींचा स्पष्टपणे भंग केला आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी साठवणे यांनी संपूर्ण पुरावे सादर करत साकोली पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार भादंवि, किशोर न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाची चौकशी सखोलपणे सुरू असून, आणखी काही आरोपी किंवा दलाल यामध्ये सहभागी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. अवैध दत्तक प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता, महिला व बालविकास विभागाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे संकेतही या प्रकरणाने दिले आहेत.