अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि मुंबई दरम्यान होणाऱ्या मोठ्या प्रवासी गर्दीचा विचार करता मध्य रेल्वेने यंदा २५० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, दिवा, लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसह कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण आणि मडगाव या मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.
२२ जुलैपासून १० सप्टेंबरपर्यंत हे विशेष रेल्वेसेवा प्राधिकृत वेळापत्रकानुसार नियमितपणे उपलब्ध असतील. या गाड्यांमध्ये वातानुकूलित (AC), साप्ताहिक, मेमू आणि दैनंदिन विशेष सेवा यांचा समावेश आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कोकणात आपल्या गावी गणपती साजरा करण्यासाठी जाणाऱ्या लोकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पुणे येथून कोकणात जाणाऱ्या ०११५१, ०११५३, ०११५५, ०१४४५ यांसारख्या गाड्या ठराविक वेळापत्रकानुसार सुटतील. त्याचप्रमाणे परतीसाठी सावंतवाडी, रत्नागिरी, मडगाव, चिपळूण येथून मुंबईकडे येणाऱ्या ०११५२, ०११५४, ०११५६, ०१४४६ गाड्याही त्या त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पोहोचतील.

या सेवेमुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन सुकर होईल, तसेच स्थानिक प्रवाशांना सहज गावी जाता येईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई आणि कोकणातील गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर प्रवास करणार आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने वेळीच नियोजन करून विशेष गाड्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
पुणे आणि रत्नागिरी, दिवा आणि चिपळूण, तसेच मडगावसाठी चालणाऱ्या वातानुकूलित गाड्यांमुळे दीर्घ प्रवास अधिक आरामदायक होईल. साप्ताहिक गाड्यांसह मेमू गाड्याही प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्वसामान्य वेळांप्रमाणे IRCTC व इतर अधिकृत प्लॅटफॉर्मवर सुरू असून प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून आपल्या प्रवासाची पूर्वतयारी करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.