WhatsApp

बेरोजगारांसाठी नोकरीचा सुवर्णसंधीचा दिवस : पुण्यात २२ जुलैला चार ठिकाणी रोजगार मेळावे

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे |
पुण्यातील नोकरी इच्छुकांसाठी २२ जुलै हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि टीकाराम जगन्नाथ कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. याच दिवशी शिरूर, आळेफाटा (ता. जुन्नर), नाणेकरवाडी (ता. खेड) येथील केंद्रांवरही रोजगार मेळावे होणार आहेत.



या मेळाव्यात १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी शैक्षणिक व तांत्रिक पात्रतेनुसार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नामांकित खासगी क्षेत्रातील उद्योजक विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखती घेणार असून, यामुळे अनेकांना त्वरित रोजगार प्राप्त होऊ शकतो.

उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे. तसेच, मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक असल्यास रेझ्युमे सोबत आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रोजगार मेळाव्याबरोबरच नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पॉलीटेक्निक, नायगाव (भोर) आणि शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, शारदानगर (बारामती) येथे करिअर समुपदेशन सत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. हे सत्रे पूर्णपणे मोफत असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.

जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी होणाऱ्या या रोजगार मेळाव्यामुळे हजारो उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत. त्यामुळे बेरोजगार तरुणांनी ही संधी सोडू नये आणि मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!