WhatsApp

चार भारतीय महिला बुद्धिबळपटू उपांत्यपूर्व फेरीत

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
बतुमी (जॉर्जिया) |
‘फिडे’ महिला विश्वचषकात नागपूरच्या युवा खेळाडू दिव्या देशमुख हिने चीनच्या झु जिनेरला टायब्रेकरमध्ये १.५-०.५ अशा फरकाने पराभूत करत मोठा विजय मिळवला. या लढतीत दिव्याने उत्कृष्ट डावसंचालन करत झुच्या डिफेन्सला भेदले. तिच्या तर्कशुद्ध चाली आणि वेळेचा योग्य वापर यामुळे तिला हा विजय मिळवता आला. यामुळे दिव्या आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली असून तिच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे.



कोनेरू हम्पीचा अनुभव कामी आला
भारताची अनुभवी खेळाडू कोनेरू हम्पी हिने स्वित्झर्लंडच्या अ‍ॅलेक्झांड्रा कोस्टेनियुकला १.५-०.५ ने हरवत पुढचा टप्पा गाठला. पहिल्या डावात हम्पीने आघाडी घेतली आणि दुसऱ्या डावात समसमान स्थिती राखत सामना जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना चीनच्या युक्सिन सोंगशी होणार असून ही लढत चुरशीची ठरणार आहे. हम्पीचा अनुभव आणि संयम याचा त्यात मोठा वाटा असू शकतो.

हरिका द्रोणवल्लीने पुनरागमन करत दिला झटका
रशियाच्या कॅटरिना लायनोविरुद्ध पहिला टायब्रेकर डाव गमावल्यानंतरही हरिकाने दुसऱ्या डावात विजय मिळवून सामना पुढे नेतला. नंतरच्या जलद टायब्रेकर डावात पहिला डाव बरोबरीत सोडवून दुसऱ्या डावात विजय मिळवत हरिकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता तिचा सामना भारतीय सहकारी दिव्या देशमुखशी होणार असून भारतासाठी ही दुहेरी संधी आहे. एक जिंकणारच, पण दोघींमध्ये स्पर्धेची रंगत वाढेल.

आर. वैशालीने ब्लिट्झमध्ये बाजी मारली
वैशालीने कझाकिस्तानच्या मेरूएर्ट कमलिदेनोव्हा हिच्याविरुद्धची लढत शेवटपर्यंत चुरशीची ठेवली. प्रारंभीचे १५+१० आणि १०+१० टायब्रेकर बरोबरीत संपल्यावर सामना ब्लिट्झ टायब्रेकरपर्यंत गेला. पहिला डाव बरोबरीत सोडवून वैशालीने दुसऱ्या डावात विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता तिच्यासमोर चीनच्या टॅन झोंगयीचे आव्हान असणार आहे.

कॅन्डिडेट्स स्पर्धेतील पात्रता जवळ
या ‘फिडे’ महिला विश्वचषक स्पर्धेतून कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी केवळ तीन खेळाडूंना प्रवेश मिळणार आहे. ही स्पर्धा २०२६च्या पहिल्या टप्प्यात होणार असून, त्यामुळे पुढील फेरीतील प्रत्येक विजय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारताच्या चारही खेळाडूंनी एकाच वेळी उपांत्यपूर्व फेरी गाठणे ही ऐतिहासिक बाब असून, यामुळे भारतीय महिला बुद्धिबळाची ताकद पुन्हा सिद्ध झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!