अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली | इंग्लंडमध्ये १८ जुलैपासून सुरू झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२५ या टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हा उच्चदर्जाचा थरार पाहायला मिळणार आहे. भारताची इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तानची पाकिस्तान चॅम्पियन्स टीम २० जुलै रोजी आमनेसामने भिडणार आहेत. ही मॅच या टूर्नामेंटमधील चौथी मॅच असून भारतासाठी पहिली, तर पाकिस्तानसाठी दुसरी मॅच ठरणार आहे.
पूर्वीचा इतिहास लक्षवेधी
२०२4 मध्ये झालेल्या पहिल्या सत्रात इंडिया चॅम्पियन्सने फायनलमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सला ५ विकेट्सने हरवले होते. त्यामुळे यंदा पाकिस्तानकडून सूडाचा सूर असणार हे निश्चित. युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली भारत आणि शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान यंदाही निर्णायक भिडंत देणार आहेत.
सामन्याची वेळ आणि ठिकाण
हा बहुप्रतिक्षित सामना २० जुलै रोजी इंग्लंडमध्ये खेळवला जाणार असून, रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होणार असून, फॅनकोड अॅपवर याचे लाईव्ह स्ट्रिमिंगही पाहता येईल. त्यामुळे घरबसल्या हा सामना पाहण्याची संधी सर्व क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या संघातील दिग्गज
भारतीय संघात शिखर धवन, सुरेश रैना, इरफान पठाण, हरभजन सिंग, युसूफ पठाण यांसारखे पूर्वीचे दिग्गज खेळाडू सहभागी आहेत. पाकिस्तानच्या संघात मिस्बाह-उल-हक, यूनिस खान, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, वहाब रियाज यांचा समावेश आहे. दोन्ही टीम्स अनुभवी असून कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रिकेट आणि भावना यांचा संगम
भारत-पाकिस्तान हे फक्त क्रिकेट मॅच नाही, तर दोन देशांच्या चाहत्यांची भावना, इतिहास आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. ऑपरेशन सिंदूरनंतर क्रिकेटच्या मैदानात ही पहिलीच थेट टक्कर असल्याने हा सामना अधिकच लक्षवेधी ठरणार आहे. लेजेंड्स लीगच्या माध्यमातून जुन्या आठवणी, प्रतिस्पर्धा आणि राष्ट्राभिमान पुन्हा एकदा क्रिकेटच्या माध्यमातून झळकणार आहे.