WhatsApp

जिल्हाधिका-यांनी केली जलालाबाद येथील सौर प्रकल्पाची पाहणी

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
अकोला |
बार्शीटाकळी तालुक्यातील ‘महावितरण’च्या ३ मेगावॅट सौर प्रकल्पाला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज भेट  देऊन पूर्ण प्रकल्पाची पाहणी केली.



शेतीला दिवसा वीजपुरवठ्याची शेतकरी बांधवांची मागणी असते.  त्यानुषंगाने शेतील दिवसा आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी  मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना व सौर प्रकल्पाचा लाभ होणार आहे, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.मुख्य अभियंता राजेश नाईक, अधिक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर आदी उपस्थित होते.

शेतीला दिवसा आणि शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. ५ ऑक्टोबर २०२४ जिल्ह्यातील या सौर प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत जिल्ह्यात पूर्ण झालेला हा पहिला प्रकल्प आहे. प्रकल्प १५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे. ३ मेगावॅट क्षमता असलेल्या या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ३३ केव्ही जलालाबाद उपकेंद्रामार्फत वितरित होते. त्याचा परिसरातील ६९७ शेतकरी बांधवांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी उपयोग होत आहे.

       स्वच्छ आणि हरित ऊर्जानिर्मितीसाठी प्रकल्प लाभदायी असून, या परिसरात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुख्य अभियंता श्री. नाईक,अधिक्षक अभियंता श्रीमती शंभरकर यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. 

        यावेळी बार्शिटाकळी येथील तहसिलदार वजिरे, कार्यकारी अभियंता अजितपालसिंह दिनोरे, गोरक्षनाथ सपकाळे, शशांक पोंक्षे,, विद्युत निरीक्षक श्री. पोकळे , महाऊर्जा व्यवस्थापक श्री. काळे, गावाचे सरपंच विजयराव थोरात यांच्यासह उपकार्यकारी अभियंता बार्शीटाकळी, मेगा इंजिनिअरिंगचे व्यवस्थापक व कर्मचारी तसेच कापशी कक्षाचे अभियंता व जनमित्र उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!