अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली | राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट आरोप करताना म्हटलं की, “खोटं बोलण्यासाठी पंतप्रधान बिहारमध्ये येत आहेत.” आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका केली. लालूंनी मतदारांना उद्देशून विचारलं, “तुम्हाला खोटं ऐकायचं आहे का?”
सूचक भाषेत टीका
लालूंनी आपल्या टीकेत वैज्ञानिक भाषेचा आधार घेत उपरोधिकपणे टीका केली. त्यांनी म्हटलं, “गुरुत्वाकर्षणाचं बल माणसाला जमिनीकडे खेचतं. त्याच धर्तीवर निवडणूकर्षणाचं बल माणसाला बिहारकडे खेचून घेऊन येतं.” यामधून त्यांनी पंतप्रधानांचा दौरा निवडणुकीच्या फायद्यासाठी असल्याचं सूचित केलं.
भाजपचा बिहारकडे कल
हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांतील विजयांनंतर भाजपाने आता बिहारमध्ये लक्ष केंद्रीत केलं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणीत एनडीए सरकार कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महाआघाडीचा तयारी मोर्चा
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी महाआघाडीची तयारी केली आहे. या आघाडीत काँग्रेससह इतर छोट्या पक्षांचा समावेश असून, भाजपाच्या विस्ताराला रोखण्यासाठी संयुक्त लढा देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
विधानसभा आकडेवारी आणि दबाव
भाजपाकडे सध्या बिहार विधानसभेत ८० आमदार आहेत. २०२० मधील निवडणुकीत त्यांनी ७४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतरच्या पोटनिवडणुकांमध्ये आणखी काही जागा मिळवून, इतर पक्षांचे आमदार फोडून त्यांनी आपली संख्या वाढवली. सध्या निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांची फेरतपासणी सुरू असून, काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापत आहे.