अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवन परिसरात झालेल्या हाणामारीने राजकीय वातावरण तापवले आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत राज्य सरकारला थेट इशारा दिला – “स्वतःच्या लोकांवर कारवाई करून दाखवा, अन्यथा आमच्याच लोकांचे हात चालतील.”
‘सत्ता साधन असावी, साध्य नव्हे’ – राज ठाकरेंचा टोला
राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. त्यांनी म्हटलं, “सत्ता ही साधन असावी, साध्य नव्हे. वाट्टेल त्या लोकांना पक्षात घेऊन त्यांच्याकडून इतरांवर गलिच्छ टीका करवून घेणं ही महाराष्ट्राची अधोगती आहे.” त्यांनी मराठी जनतेलाच प्रश्न विचारला – ‘कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र?’
मराठीच्या अपमानावरून सरकारवर हल्लाबोल
राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा उचलला. “मराठी भाषेसाठी आमचा सैनिक जर हात उचलतो, तर तो व्यक्तिगत द्वेषातून नाही, भाषेच्या स्वाभिमानातून असतो. पण आता हेच लोक कुठे आहेत?” असं म्हणत त्यांनी सरकारची भूमिका आणि दुहेरी नितीवर सवाल उपस्थित केला.
अधिवेशन खर्चाचे दाखले देत उथळपणावर टीका
राज ठाकरे म्हणाले, “एका दिवसाच्या अधिवेशनाचा खर्च दीड ते दोन कोटी रुपये. हे पैसे वैयक्तिक राजकीय वादासाठी वाया घालवले जातात. प्रश्न प्रलंबित आहेत, निधी नाही, पण माध्यमांना खाद्य देण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत.” ते पुढे म्हणाले, “आज जर या गुन्हेगारांना माफ केलं, तर उद्या विधानभवनात खून झाले तरी आश्चर्य वाटणार नाही.”
माध्यमांना आणि सरकारला थेट आव्हान
“माध्यमांनी अशा प्रकरणांमध्ये न गुंतण्याची गरज आहे. आणि सरकार जर खरंच शिल्लक साधनशुचिता मानत असेल, तर आपल्या लोकांवर कारवाई करून दाखवावी. अन्यथा आमच्या महाराष्ट्र सैनिकांना दोष देऊ नका,” असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.