अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | UIDAI ने आता आधारवरील पत्ता बदलण्यासाठी ‘अॅड्रेस प्रूफ’ अनिवार्य केला आहे. यापूर्वी ओळखीचा पुरावा दिल्यास पत्ता बदलता येत असे. मात्र, आता यासाठी पत्त्याचा स्पष्ट पुरावा लागेल. त्यामुळे कोणताही अर्ज करण्यापूर्वी संबंधित कागदपत्र तयार ठेवणं गरजेचं ठरणार आहे.
पत्ता बदलण्यासाठी मान्य असलेली कागदपत्रे कोणती?
आधारवरील पत्ता बदलण्यासाठी पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, पोस्ट ऑफिस पासबुक, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीजबिल, पाणीबिल (अलिकडील 3 महिन्याचे), विमा पॉलिसी, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, पेन्शन कार्ड, स्वातंत्र्य सैनिक कार्ड, सीजीएचएस/ईसीएचएस कार्ड यासारखी 45 प्रकारची कागदपत्रे ग्राह्य धरली जातात. याशिवाय, पती/पत्नीचा पासपोर्ट, मुलांचं शाळा सोडल्याचा दाखला अशाही कागदपत्रांचा स्वीकार केला जातो.
नाव, जन्मतारीख आणि नातेसंबंधासाठी काय आवश्यक?
ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र अशा 32 कागदपत्रांचा स्वीकार होतो. जन्मतारीखसाठी जन्मप्रमाणपत्र, दहावीची मार्कशीट, पॅनकार्ड, एसएसएलसी प्रमाणपत्र यांचा उपयोग होतो. नात्याचा पुरावा देण्यासाठी पासपोर्ट, पेन्शन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड यांसारख्या 14 कागदपत्रांची यादी UIDAI ने जाहीर केली आहे.
ऑनलाइन पद्धतीने आधार पत्ता कसा बदलाल?
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Proceed to Update’ वर क्लिक करा. आधार क्रमांक, कॅप्चा आणि मोबाईलवरील OTP टाकून लॉग इन करा. त्यानंतर नवे पत्त्याचे कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा. सबमिट करताच तुमचा पत्ता अपडेट होईल.
ऑफलाइन पद्धतीही उपलब्ध – जवळच्या केंद्रावर जा
ज्यांना ऑनलाइन अर्ज शक्य नाही त्यांच्यासाठी आधार अपडेटची ऑफलाइन सुविधा उपलब्ध आहे. यासाठी आधार केंद्रावर जाऊन फॉर्म भरावा लागेल. बायोमेट्रिक तपासणीनंतर मिळालेल्या पावतीवर URN नंबर दिला जातो, ज्यातून अर्जाचा स्टेटस ट्रॅक करता येतो.