अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी विधानभवनाच्या परिसरात घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत खुनाचा कट रचण्यात आला होता आणि या प्रकरणी मकोका आरोपींच्या गाडीतून हत्यारे सापडल्याची पक्की माहिती त्यांच्याकडे आहे.
विधानभवनात गँगवॉर, भयंकर सुरुवात
महाराष्ट्र विधानभवन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आमनेसामने भिडले. शिवीगाळ, मारहाण, कपडे फाडणे असे प्रकार खुलेआम सुरू झाले. हा प्रकार निंदनीय असून, अशा असभ्य प्रकाराने विधिमंडळाचे चारित्र्यच मलीन झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊतांचा घणाघात – हे सरकार गुंडांच्या ताब्यात
घटनेनंतर संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे म्हटलं की, राज्यात गुंडराज आले असून भाजपच्या आशीर्वादाने गुंड टोळ्या विधानभवनाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांनी आरोप केला की, या गोंधळात सामील असलेल्या काही लोकांवर मोक्का आणि खुनाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांना विधानभवनाच्या परिसरात मुक्त संचार दिला जात आहे.
राष्ट्रपती राजवटीची मागणी
राऊतांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, जर अशीच घटना विरोधकांच्या राज्यात घडली असती, तर देवेंद्र फडणवीस यांनी आक्रोश करत सरकार बरखास्तीची मागणी केली असती. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर थेट टीका करत म्हटलं की, हे सरकार संविधान चालवायला अपयशी ठरत आहे.
हनी ट्रॅप, भ्रष्टाचारावर सरकार गप्प का?
राऊतांनी सध्याच्या घडामोडींचा संदर्भ देत हनी ट्रॅप प्रकरणासह भ्रष्टाचार, आमदार निवासातील गैरप्रकार, मंत्र्यांच्या बॅगांतील पैसे यावर सरकारने मौन बाळगले आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यांनी दावा केला की, सरकारला प्रभावी विरोधी पक्षनेता नको आहे, कारण तो सर्व घोटाळ्यांची माहिती उघड करू शकतो.