अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | राज्याच्या विविध भागांतील वरिष्ठ अधिकारी, आजी-माजी मंत्री आणि राजकीय मंडळी हनी ट्रॅप प्रकरणात अडकल्याचे समोर येत आहे. नाशिक, ठाणे आणि आता पुण्यातही या संदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. पुण्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दिल्याचे समजते, परंतु अद्याप अधिकृत दुजोरा नाही. या प्रकरणाने प्रशासनात खळबळ उडवली आहे.
खंडणीविरोधी पथकांचा तपास वेगात
नाशिक व ठाणे खंडणीविरोधी पथकांनी आता प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तपासादरम्यान बऱ्याच महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओज सापडले असून त्यांचा वापर करून ब्लॅकमेल करण्यात येत होते.
खंडणी व समेटाचा प्रयत्न
प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने सुरुवातीला ४० लाख रुपये देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेलमालकाने पुन्हा पैसे मागितल्याने आणि महिलेने अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केल्याने त्याने थेट ठाणे पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर संबंधित हॉटेलमालकाने प्रकरण मिटवण्यासाठी तडजोडीचा मार्ग स्वीकारला.
महिलेचा नाशिकशी संबंध, संपत्तीतील झपाट्याने वाढ
या प्रकरणातील मुख्य संशयित महिला ही मूळची नाशिकची असून सध्या ठाण्यात वास्तव्यास आहे. तिचे शहरातील विविध भागांमध्ये तीन कपड्यांचे शोरूम असून ती महागड्या गृहप्रकल्पात राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. हॉटेल मालकाशी संबंधातून आर्थिक फायदा मिळवून तिने भरघोस संपत्ती मिळवली.
ब्लॅकमेल करून जमिनींवर कब्जा
महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर ब्लॅकमेल करून आदिवासी जमिनी हडपण्याचे, आरक्षण हटवण्याचे, अडचणीचे व्यवहार सोडवण्याचे व गुन्हे दडपण्याचे काम करवून घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. हे सर्व व्यवहार संबंधित महिलेच्या प्रभावाखाली करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे.