अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली | भारतीय रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ (ICF), चेन्नई येथे अप्रेंटिस पदांसाठी एकूण १०१० जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुतार, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, पेंटर तसेच मेडिकल लॅब टेक्निशियन (MLT) आदी पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १२ जुलैपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा स्पष्ट
फ्रेशर्स पदांसाठी उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी १२वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय, संबंधित ट्रेडसाठी आयटीआय प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांसाठीही संधी उपलब्ध आहे. फ्रेशर्ससाठी वयोमर्यादा १५ ते २२ वर्षे तर एक्स-आयटीआय उमेदवारांसाठी १५ ते २४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट दिली जाईल.
स्टायपेंड आणि अर्ज शुल्काबाबत माहिती
या अप्रेंटिसशिप प्रशिक्षणादरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंडही देण्यात येणार आहे. १०वी उत्तीर्ण फ्रेशर्सना ६००० रुपये तर १२वी व आयटीआय धारकांना ७००० रुपये प्रतिमाह स्टायपेंड मिळेल. अर्जासाठी सर्वसामान्य उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. मात्र एससी, एसटी, महिला आणि इतर आरक्षित प्रवर्गासाठी शुल्कात सूट देण्यात आली आहे.
निवड गुणवत्ता यादीवर आधारित
रेल्वे ICF अप्रेंटिस पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे होणार असून, बोर्ड परीक्षेतील गुण लक्षात घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यामुळे चांगल्या टक्केवारीचे उमेदवारांना प्राधान्य मिळेल. कोणत्याही मुलाखती किंवा परीक्षा न घेताच ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्यामुळे अर्ज करणाऱ्यांनी आपले शैक्षणिक गुण व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सोपी प्रक्रिया
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट pb.icf.gov.in वर जाऊन प्रथम नोंदणी करावी. त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरावा. अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी योग्य आकारात स्कॅन करून तयार ठेवावीत. फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंट आउट काढणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून कुठलीही ऑफलाइन अर्ज पद्धत उपलब्ध नाही.