अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पालखी मार्गांची तातडीने दुरुस्ती सुरू असतानाच, दगडी पुलावर भर पावसात करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्कने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या कामाची वेळ, पद्धत आणि गुणवत्ता याबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून वाहतूक करणे अवघड झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सडलेल्या रस्त्यांनी प्रशासनाच्या देखरेखीवर शंका उपस्थित केली होती. त्यातच कावड पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील रस्ते तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांमार्फत पॅचवर्कचे काम सुरू केले आहे.
मात्र बुधवारी सतत पावसातही शहरातील दगडी पुलावर डांबरीकरण सुरूच ठेवले गेले. विशेष म्हणजे, संबंधित विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. पावसात डांबरीकरण केल्याने ते लगेच खराब होण्याची शक्यता वाढते. अशा निकृष्ट कामावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत, यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची टीका केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “पावसात रस्त्याचे काम करणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असून, अशा कामाचे आयुष्य काही दिवसांपुरतेच मर्यादित राहते. यामुळे रस्ता पुन्हा खराब होतो आणि वारंवार निधी खर्ची पडतो.”
कामाचा दर्जा आणि वेळेचे नियोजन तपासा – नागरिकांची मागणी
शहरातील विविध भागांतील नागरिकांनी या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “अधिकार्यांच्या उपस्थितीतच नियम धाब्यावर बसवले जातात, तर मग सामान्य जनतेकडून शिस्तीची अपेक्षा कशी करावी?” असा सवाल नागरिकांनी केला आहे.
सार्वजनिक निधीचा अपव्यय थांबवा, जबाबदारी निश्चित करा!
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ हस्तक्षेप करून कामाची गुणवत्ता तपासावी, दोषींवर कारवाई करावी, आणि भविष्यात अशा प्रकार टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत, अशी जनतेची मागणी आहे.