अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | विधानसभा अधिवेशनात मुंबईच्या विकासकामांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती देताना अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या संदर्भात, “मराठी माणूस न दिसता दीनो मोरिया दिसला, पण त्याने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल,” असा रोखठोक इशारा शिंदे यांनी दिला. या विधानानंतर सभागृहात क्षणभर शांतता पसरली.
मुंबईकरांना ‘पहिलं’ मानणाऱ्या योजना
शिंदे यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले की, “मुंबईकर आमच्यासाठी प्रथम आहेत.” त्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी सुरू असलेल्या योजनांचा उल्लेख करत धारावी प्रकल्पासाठी दिलेली जमीन, कोळीवाड्यांच्या संदर्भातील निर्णय आणि पात्र-अपात्र दोघांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. शिंदेंनी सांगितले की, “पूर्वीच्या सरकारने फक्त पात्र लोकांपुरते मर्यादित निर्णय घेतले. मात्र, आम्ही सर्वसामान्य मुंबईकरांना केंद्रस्थानी ठेवले आहे.”
मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला वेग
“मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात आधी चहल यांना बोलावून रस्त्यांच्या खड्ड्यांचा विषय मांडला. दोन टप्प्यात सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्यावर काम सुरू आहे,” अशी माहिती शिंदे यांनी दिली. मुंबई शहर खड्डेमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात १.५ ट्रिलियन डॉलरच्या क्षमतेचा विकास शक्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
‘फक्त निवडणूक नाही म्हणून कामे थांबलेली नाहीत’
शिंदे यांनी अधिवेशनात बोलताना स्पष्टपणे सांगितले की, “निवडणूक झाली नसली तरी कामे सुरूच आहेत. कुठलीही योजना थांबलेली नाही.” शिंदेंनी यावेळी ठाकरे सरकारवर अप्रत्यक्षपणे टोला मारत म्हटले की, “पूर्वी निर्णय घेतले जायचे ते कंत्राटदारांसाठी, आम्ही घेतो ते सामान्य नागरिकांसाठी.”
‘तोडणारे’ नव्हे, ‘जोडणारे’ आहोत
सभागृहात शिंदे यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करत म्हटले की, “आमच्यावर आरोप होतो की आम्ही मुंबई तोडतोय, पण आम्ही मुंबई जोडतोय.” यातून त्यांनी ठाकरे गटाच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाने शिंदे सरकारवर सातत्याने मुंबईच्या स्वायत्ततेवर गदा आणण्याचा आरोप केला आहे.