WhatsApp

राज्यभर सर्रास गुटखा विक्री, भाजप आमदाराचा सरकारवर संताप

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
मुंबई |
विधानपरिषदेतील भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी राज्यात गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याची जोरदार टीका करून सरकारची अडचण वाढवली आहे. “राज्यात गुटखा बंदी आहे” असे सरकार म्हणते, पण वास्तवात प्रत्येक चौकात गुटखा मिळतोय, हे चित्र स्पष्ट असल्याचे श्रीकांत भारतीय यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. “अशा स्थितीत गुटखाबंदी आहे, हे म्हणणं हास्यास्पद आहे,” असा संतप्त सूर त्यांनी व्यक्त केला.



गुटखा विक्रीवरून संबंधित खात्यांवर प्रश्नचिन्ह
श्रीकांत भारतीय यांनी गुटखा विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासनाची कार्यपद्धतीही कठोर शब्दांत टीकली. “सर्वप्रथम कारवाई संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांवर व्हायला हवी. गुटख्याचे मोठे जाळे तयार झाले असून केवळ खालच्या पातळीवरील विक्रेत्यांवरच कारवाई केली जाते,” असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. त्यांची मागणी होती की, या साखळीच्या मुळावरच वार व्हायला हवा, फक्त वरवरची कारवाई करून सरकार जबाबदारी टाळू शकत नाही.

मंत्र्यांच्या उत्तरातून विसंगती उघड
या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की, “मागील महिन्यात ५३ ठिकाणी कारवाई करत ३ कोटी २० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.” मात्र यावर श्रीकांत भारतीयांनी लगेचच उत्तर दिलं की, जर गुटखा पकडला जात असेल, तर तो येतो तरी कुठून? गुटख्याचं विक्रीजाळं राज्यभर पसरलेलं असून, याकडे सरकारचे दुर्लक्ष दिसते, असेही त्यांनी निदर्शीत केलं.

गुटख्याची साखळी कोण नियंत्रित करतंय?
श्रीकांत भारतीय यांच्या मते, परराज्यातून गुटखा आणला जातो आणि त्याचे पॅकिंग व वितरण राज्यभर चालते. “गुटख्याची पाकिटं प्रत्येक गावात, चौकात, दुकानात सहज मिळतात. यामागे एक मजबूत नेटवर्क आहे. फक्त लहान विक्रेत्यांवर कारवाई करून सरकार जबाबदारी झटकते,” असे त्यांनी विधानपरिषदेत सांगितले.

गुटखा विक्रीबाबत कठोर कायदा हवे
आमदार भारतीय यांनी गुटखा विक्री करणाऱ्यांवरील शिक्षा अधिक कठोर करण्याची मागणी केली. “राज्यात गुटखा विक्री सुरूच आहे, यावर कठोर पावले उचलणं आवश्यक आहे. अन्यथा बंदीचा फारसा अर्थ उरत नाही,” असे ते म्हणाले. तसेच, त्यांनी हा विषय जनतेच्या आरोग्याशी निगडीत असल्याने सरकारने तातडीने कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली.

Leave a Comment

error: Content is protected !!