अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
ग्वाल्हेर | योग शिक्षिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या कुलगुरूला अखेर न्यायालयीन फटकार बसली असून, पीडितेला ३५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे, पीडित महिलेची तक्रार वेळेवर नोंदवून न घेतल्याबद्दल संबंधित पोलिसांनाही न्यायालयाने जबाबदार धरले असून, राज्य सरकारला ५ लाख रुपयांचा दंड भरून ती रक्कम संबंधित पोलिसांकडून वसूल करण्याचे निर्देशही दिले आहेत.
योग संस्थेतील वरिष्ठ पदाचा गैरवापर करत लैंगिक त्रास
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील योग प्रशिक्षण संस्थेत २०१९ मध्ये ही घटना घडली. योग शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या पीडित महिलेचा संस्थेच्या कुलगुरूने दोन वेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. पहिल्यांदा वर्गात जात असताना त्याने तिचा विनयभंग केला. त्यावेळी आरोपीच्या पदामुळे पीडित महिला गप्प राहिली. काही महिन्यांनंतर पुन्हा एकदा तिला कार्यालयात बोलावून आरोपीने लैंगिक सुखाची मागणी केली.
तक्रारीनंतरही पोलीस दुर्लक्ष करतात, न्यायालयाची कडक टीका
पीडित महिलेनं ऑक्टोबर २०१९ मध्ये क्रीडा विभागाकडे आणि पोलिसांकडे आपल्यावरील त्रासाबाबत तक्रार केली. मात्र, पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल न करता तीन वर्षे विलंब केला. अखेर प्रकरण न्यायालयात गेल्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद फडके यांनी पोलिसांच्या असंवेदनशीलतेवर कडाडून टीका केली.
नुकसानभरपाई म्हणून एकूण ३५ लाख रुपये दंड
न्यायालयाने पीडित महिलेच्या बाजूने निकाल देताना, आरोपी कुलगुरूला ३० लाख रुपये आणि मध्य प्रदेश सरकारला ५ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने चार आठवड्यांत ही रक्कम अदा करावी आणि ती संबंधित दोषी पोलिसांकडून वसूल करावी, असेही निर्देश दिले आहेत.
महिलांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई न झाल्यास पोलीसही जबाबदार
महिलांवरील अन्यायाच्या तक्रारींवर तातडीने कारवाई न केल्यास पोलीस यंत्रणेलाही जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच, न्यायालयाच्या या निर्णयामुळे महिला तक्रारींकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.