WhatsApp

व‍िराट कोहली अडचणीत! बंगळूर चेंगराचेंगरीला RCB जबाबदार

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
बंगळूर | बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीच्या भीषण घटनेचा तपशील आता स्पष्ट होऊ लागला आहे. कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयात सादर करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), आयोजक कंपनी आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांना जबाबदार ठरवले आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.



पोलिसांनी आधीच नाकारली होती परवानगी
राज्य सरकारच्या अहवालानुसार, या विजयी परेडसाठी आयोजकांनी अधिकृत परवानगी घेतली नव्हती. ३ जून रोजी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडने फक्त परेडबाबत कळवले होते, पण २००९ च्या नियमानुसार औपचारिक परवानगी आवश्यक होती. त्यामुळे पोलिसांनी या कार्यक्रमाला नकार दिला होता. मात्र, त्यानंतरही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रमोशन सुरू ठेवण्यात आले.

कोहलीच्या व्हिडिओमुळे वाढली गर्दी
आरसीबीने ४ जूनच्या सकाळी सोशल मीडियावर विराट कोहलीचा व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना विनामूल्य प्रवेशासाठी स्टेडियमबाहेर येण्याचे आवाहन केले. त्यामुळे तुफान गर्दी जमली. राज्य सरकारच्या मते, विराटच्या या आवाहनामुळे तीन लाखांहून अधिक चाहते स्टेडियमबाहेर जमले होते. पोलिसांकडून परवानगी नसतानाही एवढी गर्दी गोळा होणे ही मोठी दुर्लक्षाची बाब मानली जात आहे.

शेवटच्या क्षणी बदलले नियम, आणि गोंधळ वाढला
या घटनेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयोजकांनी शेवटच्या क्षणी – दुपारी ३.१४ वाजता – जाहीर केले की स्टेडियममध्ये प्रवेशासाठी पास आवश्यक आहे. यामुळे आधीपासून उपस्थित असलेल्या प्रचंड गर्दीत संभ्रम निर्माण झाला. हजारो लोकांनी एका वेळी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली.

गेट वेळेवर उघडले नाहीत, समन्वयाचा अभाव स्पष्ट
अहवालात नमूद करण्यात आले आहे की RCB, आयोजक संस्था आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांच्यात कोणताही स्पष्ट समन्वय नव्हता. स्टेडियमच्या गेटवर प्रवेशासाठी योग्य नियोजन नव्हते आणि गेट वेळेत उघडले गेले नाहीत. यामुळे गर्दी आणखी बिथरली. या घटनेत सात पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!