अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | महाराष्ट्र सरकारने १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी मोठी सवलत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ७० टक्के ग्राहकांना थेट फायदा होणार असून, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. यानुसार घरगुती ग्राहकांना वीज दरात २६ टक्क्यांची कपात मिळणार आहे.
१०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्यांना थेट लाभ
राज्यात सुमारे ७० टक्के ग्राहक हे दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरतात. या गटासाठी वीज दरात २६ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ही दरकपात सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी आहे. यामुळे त्यांच्या घरगुती खर्चावर थेट परिणाम होणार आहे.
औद्योगिक आणि व्यावसायिक दरही कमी
पूर्वीच्या टॅरिफ प्रस्तावात औद्योगिक व व्यावसायिक वीज दर कमी करताना घरगुती ग्राहकांवर भार टाकण्यात आला होता. मात्र यावर झालेल्या टीकेनंतर आता सर्व गटांसाठी दर कमी करण्यात आले आहेत. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील वीजदर हे इतर राज्यांपेक्षा कमी असतील, असेही सरकारचे म्हणणे आहे.
वैकल्पिक ऊर्जा आणि स्वस्त खरेदीचे धोरण
‘मेरिट ऑर्डर डिस्पॅच’ या नव्या पद्धतीमुळे राज्य सरकारने वीज खरेदीचे धोरण बदलले आहे. यामध्ये खासगी कंपन्यांकडून सोलर, विंड आणि बॅटरी स्टोअरेजवर आधारित वीज स्वस्त दरात खरेदी केली जात आहे. या करारांची मुदत २५ वर्षे असल्यामुळे दर दीर्घकाळ स्थिर राहण्याची शक्यता आहे.
नवीन टॅरिफमुळे दरात स्थिरता
सध्या महाराष्ट्रातील सरासरी वीज दर ८.३२ रुपये प्रतियुनिट आहे, तो पुढील टप्प्यात ७.३८ रुपयांवर येणार आहे. यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना आणखी दिलासा मिळेल. टॅरिफ ट्रू-अप प्रक्रियेमुळे दर वाढणार नाहीत, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
शेतीसाठी स्मार्ट मीटर आणि सौर पंप योजना
कृषी क्षेत्रात वीज वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याची योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांना नेमकी किती वीज लागते हे समजेल आणि भविष्यातील धोरण आखण्यास मदत होईल. तसेच १० हॉर्सपॉवर क्षमतेचे सौर पंपही शेतकऱ्यांना पुरवले जाणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.