अकोला न्युज नेटवर्क दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ :- जिल्ह्यातील कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाशिम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आ.ॲड निलय नाईक, आ.संजय कुटे, आ.वसंत खंडेलवाल, आ. रणधीर सावरकर, आ.गजानन घुगे, आ.आकाश फुंडकर, आ.अमित झनक,आ.तानाजी मुटकुळे, आ.लखन मलिक यांनी आ. स्व.पाटणी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून पुष्पचक्र अर्पण केले व श्रद्धांजली वाहिली.तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी जिपचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी आमदार संजय देशमुख, गुलाबराव गावंडे, मोहिनीताई नाईक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे आदी उपस्थित होते.शोकभावना व्यक्त करतांना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनाची बातमी धक्का देणारी होती. माझ्या मोठ्या बंधुप्रमाणे होते. आजही विश्वास बसत नाही. एका आजाराशी त्यांचा लढा सुरु होता. त्यातून ते बरे होत होते. सिंचन, बंधाऱ्यांच्या कामांसाठी ते आग्रही होते. जिल्ह्याचा चांगला विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. आजारी असतांना विकास झाला पाहिजे ही त्यांचा भूमिका होती. जिल्ह्याच्या विकासांचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी शोकभावना पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली.
खासदार भावना गवळी म्हणाल्या, दिवंगत आमदार राजेद्र पाटणी यांनी त्यांच्या चांगल्या कामामुळे लोकांची मने जिंकली आहे. माझ्या वडिलांसोबत त्यांनी काम केले. त्यांनी अनेक सोबती जोडले तसेच जनमानसात वेगळी छाप निर्माण केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून परिचित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गवळी परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करते, अशी शोकसंवेदना खा.गवळी यांनी व्यक्त केली. यावेळी आ.ॲड निलय नाईक, आ.संजय कुटे, आ.वसंत खंडेलवाल, आ. रणधीर सावरकर, आ.गजानन घुगे, आ. हरिष पिंपळे, आ.आकाश फुंडकर, आ.अमित झनक, आ.तानाजी मुटकुळे, आ.लखन मलिक, जिपचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी आमदार संजय देशमुख, गुलाबराव गावंडे, मोहिनी नाईक आदींनी शोकसंवेदना व्यक्त करुन आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
दिवंगत आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांच्या दुःखद निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संजय धोत्रे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोकसंदेशाद्वारे श्रद्धांजली व्यक्त केली. आ.स्व.पाटणी यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थितांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. शासकीय इतमामात पोलीसांकडून बंदुकीच्या फैरींची सलामी व मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला.