WhatsApp

जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ – प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर घणाघात

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
मुंबई | राज्यात सादर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकावरून राजकीय वादविवाद शिगेला पोहोचले आहेत. यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत भाजप, आरएसएस आणि विरोधकांनाही लक्ष केलं आहे.



“हे विधेयक म्हणजे अघोषित आणीबाणी”

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, “जनसुरक्षा कायदा म्हणजे १९७५च्या आणीबाणीचीच नवी आवृत्ती आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी जी चूक केली, तीच भाजप सरकार आज पुन्हा करत आहे. जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा हा कायदा आम्ही मान्य करणार नाही.” त्यांनी स्पष्ट केलं की, वंचित बहुजन आघाडी याविरोधात लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

जाहिरात अधिक माहिती साठी वरील फोटोवर क्लिक करा

“विरोधकांचा विरोध हा नौटंकी”

विरोधकांनाही धारेवर धरत आंबेडकर म्हणाले, “विधीमंडळात या कायद्याला पुरेसा विरोधच झाला नाही. सभागृहात गप्प बसून माध्यमांसमोर निषेध व्यक्त करणं ही केवळ नौटंकी आहे. लोकांच्या भावना माध्यमांतून व्यक्त झाल्यानंतरच विरोधक बोलायला लागले.”

“AK-47 आणि टॉमी गनची पूजा कोण करतं?”

स्फोटक आरोप करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या शस्त्रपूजेचे फोटो सर्वत्र उपलब्ध आहेत. हे AK-47 आणि टॉमी गनसारखी लष्करी शस्त्रे आहेत. सामान्य माणसाला यांची परवानगीच नाही. मग आरएसएसकडे ती कुठून आली?”त्यांनी प्रश्न केला की, “सरकार त्यांच्यावर अर्बन नक्षल म्हणून कारवाई करणार का? की कायदा फक्त सामान्य जनतेवरच?”

“असहमती मांडणं म्हणजे नक्षलवाद?”

प्रकाश आंबेडकर यांनी अधिक खोलात जाऊन विचारलं, “कामगार, शेतकरी, विद्यार्थी किंवा सामाजिक कार्यकर्ते जर सरकारविरोधात आवाज उठवत असतील, तर त्यांना अर्बन नक्षल ठरवणार का? खासगी सावकारांविरोधात आंदोलन केलं तर नक्षलवाद? मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठं गेलं?”

कायद्याचा गैरवापर होण्याची भीती

वंचित आघाडीचा स्पष्ट आरोप आहे की, जनसुरक्षा कायद्याचा वापर सरकारविरोधी आवाज दडपण्यासाठी होणार आहे. हा कायदा सरकारला अंधारात अटक करण्याचा, कार्यकर्त्यांना शांत करण्याचा अधिकार देतो, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

“निर्णायक लढा लढू”

शेवटी आंबेडकर म्हणाले, “हा लढा फक्त आमचाच नाही. सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते, युवक यांना एकत्र यावं लागेल. ही लढाई लोकशाही वाचवण्याची आहे. जनसुरक्षा कायदा मागे घेतला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू.”

Leave a Comment

error: Content is protected !!