WhatsApp

😨 देवस्थानात ‘भक्तांची लूट’! शनि शिंगणापूर ट्रस्ट बरखास्त; कोट्यवधींचा महाघोटाळा उघड

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
मुंबई | अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट शिंगणापूरमध्ये तब्बल ५०० कोटींपर्यंतच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत थेट ट्रस्ट बरखास्त करण्याची घोषणा केली असून, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.




बनावट अ‍ॅप्सद्वारे कोट्यवधींचा गोंधळ

स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचना मांडत सांगितले की, ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट अ‍ॅप तयार करून लाखो भक्तांकडून देणग्या स्वीकारल्या. एका अ‍ॅपवर ३ ते ४ लाख भक्तांनी पैसे पाठवले, अशा ३ ते ४ बनावट अ‍ॅप्सचा वापर करण्यात आला. हे पैसे थेट विश्वस्तांच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले.


२,४४७ बोगस भरती – प्रत्यक्षात कर्मचारीच नाहीत!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी धक्कादायक माहिती देताना सांगितले की, “२५८ कर्मचाऱ्यांवर ट्रस्ट चालायचा. पण अचानक २,४४७ जणांची भरती झाली. चौकशीत हे कर्मचारी अस्तित्वातच नाहीत!” एवढ्या मोठ्या बोगस भरतीने सरकारी यंत्रणेलाही धक्का बसला आहे.


🕵️ सायबर क्राईम आणि बाह्य अधिकाऱ्यांकडून तपास

या प्रकारांची सायबर क्राईम विभाग आणि अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून चौकशी केली जाणार आहे. तसेच पूर्वीच्या धर्मादाय अधिकाऱ्याने दिलेली “क्लीन चिट” संशयास्पद असल्याने त्याच्यावरही चौकशीचा बडगा उगारण्यात येणार आहे.


🧾 जमीन व्यवहार, ट्रस्ट फंडातही घोटाळे

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत सांगितले की, “दर आठवड्याला १०-१० कोटी रुपयांच्या जमिनी ट्रस्टचे विश्वस्त घेत आहेत.” त्यामुळे फक्त देणग्या नाही, तर ट्रस्टच्या मालमत्तेतही मोठा घोटाळा झाल्याचे संकेत मिळाले आहेत.


📜 पंढरपूर-शिर्डीप्रमाणे समिती होणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पंढरपूरच्या विठ्ठल आणि शिर्डीच्या साई संस्थानप्रमाणे शनिशिंगणापूर मंदिराचेही शासकीय समितीमार्फत संचालन करण्यात येईल. त्यासाठीचा कायदा करण्यात आला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होईल.”


🧹 भ्रष्ट विश्वस्तांविरुद्ध गुन्हे दाखल

मुख्यमंत्री म्हणाले, “देवाच्या नावाने लूट करणाऱ्यांना सोडणार नाही. ट्रस्टमधील सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. ज्यांनी भक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात केला आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल.”


शनि मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेला हा आर्थिक गैरव्यवहार शरमेने मान झुकवणारा आहे. सरकारने ट्रस्ट बरखास्त करून चौकशीचा निर्णय घेतला आहे, पण या मागे किती काळाचा गैरव्यवहार आहे, याची सखोल तपासणी आवश्यक ठरणार आहे. भक्तांची श्रद्धा आणि देणग्या यांची जबाबदार प्रशासनाकडून निगराणी ही काळाची गरज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!