अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने फास्टॅग (FASTag) चा गैरवापर करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. महामार्गावरील टोल नाक्यांवर पथकर वसुली सुरळीत करण्यासाठी, जे वाहनचालक त्यांच्या वाहनावर फास्टॅग चिटकवत नाहीत, त्यांची वाहने आता थेट काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत.
NHAI च्या नव्या धोरणानुसार, वाहनचालक फास्टॅग घेऊनही ते पुढच्या काचेवर लावत नाहीत, ज्यामुळे टोल प्रणालीमध्ये अडथळे निर्माण होतात. परिणामी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी, चुकीची शुल्क आकारणी, चुकीच्या लेनचा वापर आणि एकूण टोल व्यवस्थेत गोंधळ निर्माण होतो.
🚧 NHAI ची तक्रार नोंदविण्याची नवीन यंत्रणा
NHAI ने स्पष्ट केले आहे की, टोल संकलन करणाऱ्या एजन्सींना आता अशा गाड्यांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र ई-मेल प्रणाली दिली आहे. या तक्रारी मिळाल्यानंतर संबंधित वाहनांची तात्काळ तपासणी केली जाईल आणि दोषी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. हे पाऊल ‘वार्षिक पास’ आणि ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ (MLFF) प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वी फास्टॅग व्यवस्थेची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने उचलण्यात आले आहे.
🚙 वाहनधारकांचे जबाबदारी
NHAI ने सांगितले की, फास्टॅग घेतल्यावर ते योग्य ठिकाणी म्हणजेच वाहनाच्या समोरील काचेवर स्पष्टपणे लावणे बंधनकारक आहे. कोणत्याही स्वरूपात फास्टॅग गुप्त ठेवणे, चुकीच्या ठिकाणी लावणे किंवा हेतुपुरस्सर न लावणे यावर आता कठोर कारवाई केली जाईल.