अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
भुवनेश्वर | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज ओडिशामधील भुवनेश्वरच्या बारामुंडा मैदानावर आयोजित “संविधान बचाओ समावेश” या जाहीर सभेत जोरदार भाषण करत ओडिशा आणि केंद्रातील भाजप सरकारवर घणाघात केला. त्यांच्या भाषणातील सर्वात धक्कादायक दावा म्हणजे – “ओडिशात ४०,००० हून अधिक महिला बेपत्ता झाल्या असून, आजपर्यंत सरकारकडे त्याचा ठोस तपशीलच नाही.”
🚨 ४०,००० महिला बेपत्ता, पण सरकार गप्प?
राहुल गांधी म्हणाले, “ओडिशात महिलांवरील अत्याचार दररोज घडतात. पण सरकार मूकदर्शक बनले आहे. ४० हजारांपेक्षा जास्त महिला बेपत्ता असताना पोलिस यंत्रणा निष्क्रिय आहे. या स्त्रिया कुठे गेल्या? त्यांचं अपहरण झालं? त्यांचा छळ झाला? याचा तपास कोण घेणार? सरकारकडे कोणतेही उत्तर नाही.”
💸 “गरीबांचं लुटमार, अब्जाधीशांचं राज्य”
राहुल गांधींनी भाजप सरकारवर तीव्र टीका करताना सांगितलं की, “ओडिशा सरकारचं काम एकच – गरीबांचा पैसा अब्जाधीशांच्या घशात टाकणं. आधी बीजेडीने हेच केलं, आता भाजप करत आहे. दलित, आदिवासी, शेतकरी, मजूर यांचं शोषण सुरू आहे. तर दुसरीकडे ५-६ अब्जाधीशांना सरकार पाठिंबा देतं आहे.”
🛑 “अदानीसाठी रथ थांबतो, जनतेसाठी नाही!”
राहुल गांधींनी पुन्हा एकदा अदानी यांचा उल्लेख करत राजकारणातील कॉर्पोरेट हस्तक्षेपावर सवाल उपस्थित केला. त्यांनी म्हटलं, “अदानी ओडिशा सरकार चालवतो, मोदींनाही तोच चालवतो. जगन्नाथ रथयात्रेतही अदानीसाठी रथ थांबवला जातो. पण महिलांवर अत्याचार होत असताना सरकार गप्प असतं. हे सरकार जनतेचं नाही, अब्जाधीशांचं आहे.”
🗳️ “निवडणूक आयोग भाजपसाठी काम करतो”
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. “महाराष्ट्रात निवडणूक चोरल्या गेल्या, बिहारातही तेच घडत आहे. आयोग स्वतःचं कर्तव्य विसरला आहे. तो फक्त भाजपसाठी काम करतो,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
🌾 “आदिवासींच्या हक्कासाठी काँग्रेस लढणार”
राहुल गांधींनी PESA कायद्याच्या अंमलबजावणीवरूनही सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले, “आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून हाकललं जातंय. त्यांचा हक्क नाकारला जातोय. काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. आम्ही लढून त्यांच्या हक्कांची पुनःप्राप्ती करू.”
👥 कोण होते उपस्थित?
या समावेश रॅलीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष सरत पटनायक, माजी केंद्रीय मंत्री भक्तचरण दास यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते व जनतेचा मोठा जमाव उपस्थित होता.
राहुल गांधींनी ओडिशातील भाजप सरकारच्या कारभारावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत एकप्रकारे राजकीय रणशिंग फुंकले आहे. ४०,००० महिलांच्या बेपत्ता होण्याचा मुद्दा राजकीयदृष्ट्या गंभीर बनत चालला असून, यावर सरकार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.