अकोला न्युज डेक्स दिनांक ३० औक्टोबर :- गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. परंतु मराठा आरक्षणावरून या मुद्द्यावर सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नाही. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नेत्यांविरोधात रोष निर्माण झाला असून काही ठिकाणी नेत्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अकोला जिल्ह्यातही या रोषाची सुरुवात झाली असून पातुर तालुक्यातील चरणगाव येथे राजकीय पुढार्यांना गावात प्रवेश बंदीचे फलक शनिवारी लावण्यात आल्याने जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.
गेल्या 1 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटले होते. तिथून मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी तीव्र होत गेले. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाची अखेर सरकारने दखल घेऊन एक महिन्याची मुदत मागितली होती. परंतु ही मुदत उलटून गेली तरीही सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज बांधवांमध्ये पुन्हा संताप निर्माण होत आहे. या संतापातून काही ठिकाणी नेत्यांना मराठा समाज बांधवांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे.
सकल मराठा मोर्चाचे पडसाद आता अकोला जिल्ह्यातही पडताना दिसतायेत, अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चरणगावात राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. तसं फलक गावाच्या प्रवेश रस्त्यावर लावण्यात आले आहे. ‘चुलीत गेले नेते, अन चुलीत गेला पक्ष’ मराठा आरक्षण एकच लक्ष , राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी अस फलकावर स्पष्ट लिहिलं आहे. जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत नेत्यांना गावात प्रवेश बंदी करू अस निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. आणि गेल्या तीन दिवसांपासून जारांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे आता चरणगावचे गावकरी सुद्धा सोमवार पासून पातूर तहसीलसमोर साखळी उपोषणाला बसणार आहेत.