WhatsApp

🌧️ पावसाचा प्रकोप! विदर्भात मुसळधार पावसामुळे २४ तासांत ६ मृत्यू, १ बेपत्ता

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
नागपूर – संपूर्ण विदर्भावर पावसाने घाला घातला आहे. मागील २४ तासांतील मुसळधार पावसामुळे एकूण ६ जणांचा मृत्यू झाला असून, १ व्यक्ती बेपत्ता आहे. नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात या आपत्तींनी कहर केला आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले असून, पूरग्रस्त भागात एनडीआरएफ व एसडीआरएफ चा बचाव कार्यात सहभाग सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पूरस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला असला, तरीही मृत्यूंच्या संख्येमुळे राज्यभरातून चिंता व्यक्त होत आहे.




नागपूरमध्ये पाण्याचा कहर

नागपूरमध्ये मागील १२ तासांत १३७.४ मिमी पाऊस कोसळल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. बोरगाव बुजुर्ग येथील अनिल पानपत्ते (४०) हे पुलावरून जाताना वाहून गेले असून, त्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. तर कार्तिक लाइसे (१८) हा उप्पलवाडी भागात नाल्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह सापडला आहे.


गोंदियामध्ये झाड कोसळून मृत्यू

गोंदियाच्या सडक अर्जुनी भागात झाड कोसळून भीषण दुर्घटना घडली. वासुदेव खेडकर व आनंदराव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला, तर रितीक दिघोरे हा गंभीर जखमी आहे. कारमधून मासे आणण्यासाठी गेलेल्या या व्यक्तींवर अचानक झाड कोसळल्याने ही घटना घडली.


🌊 वर्धा आणि यवतमाळमध्ये पुराचे बळी

वर्ध्याच्या बोंदर ठाणा गावात प्रफुल्ल शेंद्रे (३०) हा युवक नदी ओलांडताना वाहून गेला. बुधवारी त्याचा मृतदेह पुलापासून दीड किलोमीटरवर आढळून आला.

तर यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील धानोरा येथील सतीश दुर्गावर (४०) हे शेतातून परतत असताना नाल्यात वाहून गेले. अद्याप त्यांचा शोध सुरू आहे.


🛑 रस्ते बंद, नागरिक अडचणीत

भंडाऱ्यात काही भागात रस्ते वाहून गेले असून, नागपूर ते गडचिरोली (आरमोरी मार्ग) हा रस्ता बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. नागपुरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.


मुख्यमंत्री म्हणाले – पूर नियंत्रणात!

विधानसभेत पूरस्थितीवर चर्चा झाली. काँग्रेसचे नाना पटोले यांनी पूरग्रस्तांची परिस्थिती मांडली. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पूरस्थिती नियंत्रणात आहे, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सज्ज आहेत. काही प्रवासी अडकले होते, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.” गोसिखुर्द धरणातून पाणी सोडल्यामुळे नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


विदर्भातील मुसळधार पावसाने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असले तरी येणाऱ्या काही दिवसांतील हवामान लक्षात घेता आणखी सतर्कता आवश्यक आहे. नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

Leave a Comment

error: Content is protected !!