WhatsApp

📢 विद्यार्थ्यांच्या दारी एसटी पास: शिक्षणात सुलभता, सेवेचा नवा टप्पा

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
मुंबई | महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी ‘थेट शाळेत पास’ ही अभिनव योजना राबवली असून, अल्पावधीतच सुमारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. आता ना रांगेत उभं राहावं लागणार, ना आगारात चकरा माराव्या लागणार कारण तुमचं एसटी पास थेट तुमच्या शाळेत पोहोचणार आहे.



परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत राज्यभरातील विद्यार्थ्यांना एसटी पास शाळेच्या ठिकाणीच वितरित करण्यात आले. यामध्ये १ लाख ६१ हजार २०४ विद्यार्थी आणि ३ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थिनी अशा मोठ्या संख्येने लाभार्थी समाविष्ट आहेत.

विद्यार्थिनींसाठी तर ही योजना अधिकच लाभदायक ठरत आहे, कारण ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना’ अंतर्गत इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पास देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मात्र केवळ ३३.३३ टक्के शुल्क भरून पास मिळतो, कारण राज्य शासन त्यांच्या तिकिटावर ६६.६६ टक्के सवलत देत आहे.

ही योजना सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आगारात जाऊन पास घ्यावा लागायचा, अनेक वेळा रांगेत उभं राहावं लागायचं, वर्ग बुडवावा लागायचा. आता मात्र एसटीचे कर्मचारी थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पास देत आहेत. हे शक्य होण्यासाठी शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची यादी आगार व्यवस्थापनास पुरवली होती. या माध्यमातून एक यशस्वी समन्वय साधण्यात आला.

ही योजना केवळ पासपुरती मर्यादित नाही, तर शिक्षणात सुलभता, सुरक्षित प्रवास, आणि विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा गाठण्याची सुविधा हे सर्व घटक या निर्णयामागे आहेत. एसटी महामंडळाने १६ जूनपासून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबवली, जी आता यशस्वी ठरताना दिसत आहे.

परंतु काही समस्याही आहेत. दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांमधील अनेक विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे की काही शालेय फेऱ्या अचानक रद्द केल्या जात आहेत. परिणामी त्यांना शाळा गाठणं अवघड होतं. याकडे लक्ष देत मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत शालेय बस फेऱ्या रद्द होऊ नयेत. प्रत्येक आगारप्रमुखाने आपल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यामुळे अडचण होणार नाही याची जबाबदारी घ्यावी, असेही त्यांनी बजावले आहे.

या संपूर्ण उपक्रमामुळे एसटी महामंडळाचा सार्वजनिक प्रतिमेवर सकारात्मक परिणाम होताना दिसतोय. विद्यार्थ्यांना अधिक वेळ वाचतो, त्यांचा शिक्षणाकडे कल वाढतो आणि पालकांनाही दिलासा मिळतो. शिवाय, एसटी कर्मचाऱ्यांनीही आपलं उत्तरदायित्व योग्य प्रकारे पार पाडल्याचं यामधून सिद्ध झालं आहे.

अनेक पालकांनी आणि शालेय व्यवस्थापनांनी एसटी प्रशासनाचे आभार मानले आहेत. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांनी स्वतः हातात पास घेतल्यावर आनंदाने फुलून गेल्याची दृश्येही पाहायला मिळाली.

या योजनेमुळे ‘एसटी’ ही केवळ प्रवासाची साधनाच राहिली नसून, ती आता शिक्षणाचा आधार बनली आहे. भविष्यात या योजनेला अधिक व्यापक रूप देऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही अधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!