अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक जागृतीसाठी जर एखाद्या व्यक्तीने युगप्रवर्तक कार्य केलं असेल, तर तो एकमेव आणि अविभाज्य चेहरा म्हणजे स्वामी विवेकानंद. ४ जुलै १९०२ या दिवशी त्यांनी केवळ ३९व्या वर्षी महासमाधी घेतली, पण त्यांच्या विचारांची आणि प्रेरणेची शिदोरी आज १२२ वर्षांनंतरही नवभारताला दिशा दाखवत आहे.
विवेकानंद हे केवळ एक संन्यासी नव्हते, ते होते विचारांचे योद्धा, कर्मयोगाचे प्रचारक आणि भारतीय तरुणांना आत्मभान देणारे जागवणारे शक्तिस्वरूप. त्यांनी दिलेला संदेश – “उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत थांबू नका!” – हा आजही प्रत्येक महाविद्यालयाच्या भिंतीवर कोरलेला दिसतो, कारण त्या एका वाक्यात जणू संपूर्ण जीवनशास्त्र सामावलेलं आहे.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासूनच तल्लख बुद्धिमत्ता, अभ्यासाची आवड, आणि सत्यशोधनाचा आग्रह यामुळे ते वेगळे ठरले. रामकृष्ण परमहंस यांच्याशी त्यांची झालेली भेट ही त्यांच्या जीवनातील निर्णायक वळण ठरली. रामकृष्णांनी विवेकानंदांना केवळ अध्यात्म शिकवलं नाही, तर त्यांच्यातील देशभक्त, समाजसुधारक आणि जागतिक विचारवंत घडवला.
१८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे पार पडलेल्या जागतिक धर्मसंसदेतील त्यांचं “सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका…” असं सुरू होणारं ऐतिहासिक भाषण म्हणजे केवळ एक वक्तृत्व नव्हे, तर ते एक संस्कृतीचा गौरव, आत्मशक्तीचा आविष्कार आणि भारताच्या विचारसंपत्तीचा थेट जागतिक मंचावर स्फोट होता. त्या एका भाषणाने पाश्चिमात्य देशांत भारताच्या अध्यात्माची, सहिष्णुतेची आणि बौद्धिक संपत्तीची नवी ओळख निर्माण झाली.

पण त्यांचं कार्य तिथेच थांबलं नाही. भारतात परत आल्यानंतर त्यांनी रामकृष्ण मिशन या संघटनेची स्थापना केली. ह्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, समाजसेवा यांना प्राधान्य देत त्यांनी धर्माचा सामाजिक उपयोग घडवून आणला. त्यांनी “धर्म म्हणजे फक्त उपासना नव्हे, तो माणसाच्या उन्नतीचा मार्ग आहे” हे सांगितलं.
स्वामी विवेकानंदांनी तरुणांमध्ये असलेल्या अपार शक्तीवर विश्वास ठेवला. त्यांनी म्हटलं – “माझ्या हजार संन्याशांपेक्षा मला एक चांगला, शिस्तबद्ध तरुण द्या, मी भारताचं भविष्य बदलून दाखवीन!” अशा विश्वासाने त्यांनी तरुणांना आत्मनिर्भरतेची, सशक्ततेची आणि विज्ञाननिष्ठतेची शिकवण दिली.
त्यांच्या मते, भारताला गरज होती शिक्षणाची, स्वावलंबनाची आणि आत्मविश्वासाची. त्यांनी इंग्रजी भाषेचं समर्थन केलं कारण ती जागतिक संवादाची कळी होती. त्यांना भारताचा प्राचीन अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम साधायचा होता.
स्वामींच्या मृत्युचं वर्ष म्हणजे १९०२. त्यांच्या मृत्यूचा दिवस – ४ जुलै – आजही ‘राष्ट्रीय आत्मबोध दिन’ म्हणून साजरा केला गेला पाहिजे, इतका त्यांचा प्रभाव अद्यापही जिवंत आहे. त्यांनी सांगितलेली मूल्यं म्हणजे ‘धैर्य, संयम, परिश्रम, आणि श्रद्धा’.
आज आपण डिजिटल युगात आहोत, माहितीचा स्फोट झालाय, पण तत्त्वज्ञानाची तहान अजूनही भागलेली नाही. विवेकानंद यांचं जीवन आणि विचार म्हणजे त्या तहानेला दिशा देणारी गंगा आहे. शिक्षण व्यवस्था, नैतिक मूल्यं, युवाशक्तीचा उपयोग यांबाबत त्यांचे विचार आजही लागू होतात आणि जगभरातील शैक्षणिक संस्था, सरकारे, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याच विचारांना आत्मसात करत आहेत.
आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण त्यांचं स्मरण करत असताना, फक्त फोटोला हार अर्पण न करता त्यांच्या विचारांनाही मनात जागा द्यायला हवी. स्वामींनी जो दीप प्रज्वलित केला, तो पुढे नेत राहणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल.