महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार आता ऐन रंगात आला असून, प्रचाराचा शेवटचा विकेंड असल्याने राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे नेते सभा, रोड शो, पदयात्रा आणि जाहीर सभांच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.
या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, निवडणुका शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पडाव्यात यासाठी राज्य शासनाने ड्राय डेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या आदेशानुसार महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये दारूची सर्व दुकाने, बार आणि परमिट रूम बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार,
🔹 मंगळवार, १३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून मद्यविक्री बंद होणार
🔹 १४ जानेवारी (पूर्ण दिवस) ड्राय डे
🔹 १५ जानेवारी (मतदानाचा दिवस) ड्राय डे
🔹 १६ जानेवारी (मतमोजणी पूर्ण होईपर्यंत) ड्राय डे
म्हणजेच १३ ते १६ जानेवारी या चार दिवसांच्या कालावधीत राज्यातील संबंधित महानगरपालिका क्षेत्रांमध्ये दारूची दुकाने, बार आणि परमिट रूम पूर्णतः बंद राहणार आहेत.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण तापले असताना, ड्राय डेच्या निर्णयामुळे अनुचित प्रकार टाळण्यास मदत होईल आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. आता १५ जानेवारीला मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.









