WhatsApp

ब्रेकिंग मुर्तीजापुर | मद्यधुंद एर्टिगा चालकाची भरधाव दहशत! एक डझनावर जखमी, ऑटोचालक गंभीर, चालक फरार

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो संतोष माने रिपोर्ट मूर्तिजापूर दिनांक १२ जून २०२५ :- मुर्तीजापुर शहरातील मुख्य रस्त्यावर नाका नं. 7 जवळ आज गुरुवार 12 जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भीषण अपघाताने थरकाप उडवला! भरधाव आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एर्टिगा कार (MH30 BL 7820) चालकाने प्रथम रस्त्यावरून पायी जाणाऱ्या इसमाला उडवले आणि त्यानंतर सवारी घेऊन जाणाऱ्या ॲपे ऑटो (MH37 G 6352) वर थेट धडक दिली. या धडकेत ऑटोमधील सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले, तर काही किरकोळ जखमी आहेत. विशेष म्हणजे ऑटो चालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरू आहेत.



या अपघातात जखमी झालेले काही जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनास्थळी तातडीने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पो.कॉ. नंदकुमार टीकार, ज्ञानेश्वर आडे, ट्राफिक पोलीस पंढरीनाथ पोळे यांनी धाव घेत वाहतूक नियंत्रणात आणली व 108 तसेच खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एर्टिगाचा चालक मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे वाहन चालवताना थेट भररस्त्यावर कहर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघात घडल्यानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. सदर घटनेचा पंचनामा सुरू असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची जोरदार मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!