अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो स्वप्निल सुरवाडे दिनांक १६ एप्रिल २०२५ :- रात्रीच्या अंधारात जे घडलं, त्याने पातूर शहर हादरून गेलं होतं. १२ एप्रिल २०२५ च्या रात्री, जेव्हा बहुतेक नागरिकांनी आपल्या घरी निवांतपणे रात्रीचं जेवण उरकलं होतं, त्याच वेळी पातूर-तुळजापूर रोडवरील गावठाण भागात एक भयावह दृश्य समोर आलं — 60 वर्षीय सै. जाकीर सै. मोहिद्दीन यांचा निर्घृण खून.
एका साध्या प्रश्नाच्या सुरुवातीने उभ्या राहिलेल्या या हत्येचा कथानक एखाद्या काळजाचा ठाव घेणाऱ्या थ्रिलर चित्रपटासारखं आहे. अल्तमश खान शहजाद खान नावाचा तरुण रस्त्याच्या कडेला दुचाकी ढकलत होता. त्याला पाहून सै. जाकीर यांनी सहजपणे विचारले, “बेटा, काय झालं? गाडी का ढकलतोय?” पण या साध्या संवादाचं उत्तर रक्ताने दिलं गेलं.
अल्तमशच्या डोळ्यांत त्यावेळी काय चाललं होतं, हे सांगणं कठीण. पण त्याने आपल्या खिशातून चाकू बाहेर काढला आणि जणू काय एखाद्या यंत्रसारखा तो वार करू लागला. दोन जबरदस्त वार सै. जाकीर यांच्या पोटात घालण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण आधीच तयार बसलेले नवाब व हमीद हे दोघे साथीदार तिथे प्रकट झाले आणि त्यांनी तब्बल 15 वार करून त्या वृद्धाचा अंत केला.
ही घटना घडली आणि काही मिनिटांत परिसरात खळबळ माजली. लोकांनी आरडाओरड केली, पोलिसांना फोन गेले. पातूर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्या काळोख्या रात्रीच्या अंधारात गुन्हेगार हरवून जावेत अशी शक्यता होती, पण पोलिसांनी निर्धार केला होता — यावेळी अपराध्यांना फरार होऊ द्यायचं नाही.
पोलिसांनी सुरुवातीला संशयित म्हणून इजरार खान या व्यक्तीला ताब्यात घेतलं. मृतकाच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई झाली. मात्र पातूर पोलिसांनी केवळ यावर विश्वास न ठेवता, तपासाच्या सूक्ष्म पातळ्यांवर काम सुरू केलं. त्यांचे मार्गदर्शक ठरले पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि बाळापूरचे उपविभागीय अधिकारी गजानन पडघन. पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिषेक नावघरे, बंडू मेश्राम, श्रीकांत पातोंड, इंगळे मेजर आणि त्यांच्या टीमने दिवस-रात्र तपास सुरू ठेवला.
दोन दिवसात मिळालेले पुरावे, फोन लोकेशन, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, आणि काही गुप्त माहितीच्या आधारे अखेर खरे आरोपी समोर आले. अल्तमश खान, नवाब शहा आणि हमीद खान — हे तिघेही एका योजनाबद्ध कटाचा भाग होते. त्यांच्या कबुलीजबानीतून स्पष्ट झाले की, अल्तमश हा मुद्दाम गाडी ढकलत रस्त्यावर आला होता. जेव्हा सै. जाकीर यांनी संवाद साधला, तेव्हा ही संधी साधून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
सदर हत्या ही शेतीमधून जाणे येण्याच्या पूर्व वैमान्यातून करण्यात आल्याचा कबुली जबाब आरोपींनी देताच हे ऐकून पातूरच्या नागरिकांना धक्का बसला. पण याच वेळी पोलिसांची कार्यक्षमता आणि सत्यतेचा शोध घेण्याची निष्ठाही अधोरेखित झाली. संशयित म्हणून अटक झालेला इजरार खान निर्दोष ठरला आणि त्याला मुक्त करण्यात आले. ही न्यायाची खरी झलक होती. पोलिसांनी ज्या तत्परतेने खरे गुन्हेगार ओळखले, त्याचा सर्वत्र गौरव होत आहे.
सध्या आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, २३८(अ), ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात न्यायालयीन कार्यवाही सुरू झाली आहे.
ही घटना फक्त एका खुनाची नव्हे, तर पोलिस तपासाची एक यशोगाथा बनली आहे. समाजात भीतीचं सावट पसरवणाऱ्यांना, दोन दिवसांच्या आत गजाआड करण्याची ताकद अजूनही आपल्या पोलिसांमध्ये आहे, हे या प्रकरणातून अधोरेखित झालं आहे.